बुलडाणा: शासकीय महिला रूग्णालयातील डॉक्टरांनी एका महिला रूग्णाच्या गर्भाशयातील सहा किलो वजनाचा फायब्राईडचा ट्यूमर बाहेर काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. एक वर्षापासून तीव्र पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या या महिलेने शासकीय महिला रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करवून घेतली असता तीच्या गर्भाशयात मोठ्या आकाराचा फायब्राईड ट्युमर वाढत असल्याचे सोनोग्राफीमध्ये दिसून आले.
या महिला रूग्णाचा रक्तगट हा ' बी - निगेटिव्ह' या दुर्मिळ प्रकारातील असल्याने तसेच यापुर्वी तीच्या दोन सिझेरिन शस्त्रक्रिया झालेल्या असल्याने गर्भाशयाची शस्त्रक्रिया करणे गुंतागुंतीची व जोखमीची असल्याने वैद्यकीय पथकासमोर एकप्रकारे आव्हानच होते. पोटात वाढलेल्या ट्युमरचा मोठा आकार पाहता महिलेच्या जीवीताच्या सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्रक्रिया विनाविलंब करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गुरूवार २९ जानेवारी रोजी जिल्हा महिला रूग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कैलास झिने , अधिक्षक डॉ.प्रशांत पाटील, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ.संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.संतोष वानखेडे, डॉ.संजीवनी वानरे, डॉ.योगेश शिंदे व डॉ.प्रियंका पाटील यांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया करून महिला रूग्णाच्या गर्भाशयातून सहा किलो वजनाचा ट्युमर बाहेर काढला आहे. यामुळे महिला रूग्णाला वेदनामुक्त होऊन दिलासा मिळाला आहे.