Crime News file photo
बुलढाणा

Crime News: लग्नाच्या नवव्या दिवशी वडिलांनीच केली नवविवाहित लेकीची हत्या; शीर धडावेगळे केले, धक्कादायक कारण आलं समोर

नवविवाहित मुलगी लग्नाच्या सहाव्याच दिवशी माहेरी परतली. संतापलेल्या वडिलांनी बांबूचा वार करून तीची हत्या केली आणि मुलाच्या मदतीने मुलीचे शीर धडावेगळे केले.

पुढारी वृत्तसेवा

Buldhana father killed Newlywed daughter

बुलढाणा: नवविवाहित मुलगी लग्नाच्या सहाव्याच दिवशी माहेरी परतली. चुलत भावाशी अनैतिक संबंध असल्यामुळे ती सासरी जायला तयार नसल्याने संतापलेल्या वडिलांनी बांबूचा वार करून तीची हत्या केली आणि मुलाच्या मदतीने मृत मुलीचे वेगळे केलेले शीर व धड मध्यप्रदेशातून दुचाकीवरून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या राजूरा शिवारात आणून टाकल्याचे प्रकरण एलसीबीच्या तपास पथकाने उघडकीस आणले आहे.

तरुणीचे शीर व धड वेगळे; तपासाचे पोलिसांपुढे होते आव्हान

एलसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारातील एका शेताच्या बांधावर अज्ञात तरुणीचे शीर व धड वेगळे करून जाळण्याचा प्रयत्न करत कुणीतरी फेकून दिल्याचे २६ एप्रिल रोजी आढळून आले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मृत तरुणी कोण? हे शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या पथकाकडे तपास सोपवला. पथकाने अकोला, अमरावती, जळगाव खानदेश व ब-हाणपूर (मध्यप्रदेश) या लगतच्या चार जिल्ह्यांतील बेपत्ता तरूणीची माहिती मिळवली.

मध्यप्रदेशात नवविवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार अन् संशयाची बळावला

पोलीस स्टेशन खकणार जि. बु-हानपूर येथे १ मे रोजी बापूराव नत्थू कळमेकर (५५) रा. खडकी (मध्यप्रदेश) यांनी त्यांची नवविवाहित मुलगी शिवानी प्रकाश भिलावेकर (रा. खा-या टेंभूर, ता.धारणी जि. अमरावती) ही २५ एप्रिल पासून माहेरच्या घरून कुणालाही न सांगता निघून गेल्याची पोलिसांत फिर्याद दिली होती. बुलढाणा एलसीबीच्या पथकाला या तपासादरम्यान काही स्त्रोतांकडून गोपनीय माहिती मिळाल्यावरून फिर्यादी बापूराव कळमेकर व त्याचा मुलगा अजय बापूराव कळमेकर या पिता -पुत्रांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली.

चुलत भावाशी अनैतिक संबंध

मृत शिवानी हिचा विवाह १५ एप्रिल रोजी प्रकाश बाळाराम भिलावेकर (रा. खा-या टेंभूर, ता.धारणी, जि.अमरावती) याच्याशी झाला होता. लग्नाच्या सहाव्याच दिवशी (२० एप्रिल) नवविवाहिता शिवानी ही माहेरी म्हणजे खडकी (मध्यप्रदेश) येथे परतली होती. दरम्यान, २३ एप्रिलच्या रात्री शिवानी हिचे तीच्या चुलत भावाशी अनैतिक संबंध असल्याचे व त्यामुळे ती सासरी नांदायला जाण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले. वडिल बापूराव यांनी नवविवाहित लेक शिवानीला समजावले व सासरी नांदायला जाण्यास सांगितले. पण चुलत भावाच्या प्रेमात आंधळी झालेली शिवानी काही एक ऐकायला तयार नव्हती.

...अन् संतापलेल्या वडिलांनी लेकीच डोक फोडलं

संतापाच्या भरात वडील बापूराव कळमेकर यांनी शिवानीच्या डोक्यावर बांबूने जोरदार प्रहार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बापूरावने मृत शिवानीचा मृतदेह एक दिवस घरात लपवून ठेवला व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुलगा अजय कळमेकर याची मदत घेतली. दुस-या दिवशी वडील व भाऊ दोघांनी मिळून शिवानीचा मृतदेह खडकी (मध्यप्रदेश) येथून दुचाकीवरून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शेतशिवारात आणून टाकला. तीचे शीर व धड वेगळे करून जाळण्याचा प्रयत्न करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी रक्ताने भरलेले स्वतःचे कपडे व गुन्ह्यातील हत्यारे जंगलामध्ये फेकून दिले.

मध्यप्रदेशात माहेर, विदर्भातील अमरावतीत सासर, मृतदेह फेकला बुलढाण्यात

नवविवाहित मुलीची हत्या करून व प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी पित्याने मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती. पिता-पुत्राला जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मध्यप्रदेशात माहेर व विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सासर असलेल्या नवविवाहितेचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यात आणून टाकला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने हत्येच्या गुन्ह्याचे बिंग फोडले. पोटच्या विवाहित मुलीची हत्या करणारा पिता व त्याला मदत करणारा भाऊ, असे दोघेही आता गजाआड गेले आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर, एपीआय यशोदा कणसे, पीएसआय पंकज सपकाळे, पोहेकॉ एजाज खान, गणेश पाटील, अजीज परसूवाले, अमोल शेजोळ, मंगेश भंगाळे, अमोल वनारसे, दिपक नाताळ, राकेश नायडू यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT