बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड आणि पृथ्वीराज गायकवाड यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात बुधवारी (१ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सुरू झालेल्या या उपोषणाची राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने तत्काळ दोन पानी प्रसिद्धीपत्रक जारी करून वर्ष २०२६ मधील पहिल्या सहामाहीतील कामगिरीचा आढावा सादर केला. या प्रसिद्धीपत्रकात जिल्हा पोलिस दलाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याचा दावा करण्यात आला असून, उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपांना अप्रत्यक्षपणे उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत जिल्हा पोलिसांनी क्लिष्ट व गंभीर गुन्ह्यांची उकल, कायदा व सुव्यवस्था राखणे, अवैध धंद्यांवर कारवाई आणि गुन्ह्यातील मालमत्ता जप्त करण्यात विशेष कामगिरी केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खून, दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांपैकी सुमारे ७९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
'मिशन परिवर्तन' या अंमली पदार्थविरोधी अभियानांतर्गत ५५ कारवाया करून ५८ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवायांत ३२४ किलो ८४६ ग्रॅम गांजा व अफू जप्त करण्यात आली. तसेच आर्म्स अॅक्टअंतर्गत १९ कारवाया, अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात ५३ कारवाया करून १०१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दारूबंदी कायद्यान्वये १,९८१ कारवायांत २,०२८ आरोपींना, तर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ८४२ कारवायांत १,२१५ आरोपींना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. गुटखा प्रतिबंधक कारवायांत १२ प्रकरणांत १४ आरोपींना अटक करण्यात आली.
याशिवाय अपहरणाच्या ११० प्रकरणांमध्ये ७९ मुली आणि १२ मुलांची सुटका, तसेच हरवलेल्या ७१८ व्यक्तींपैकी ३६६ महिला आणि १४६ पुरुषांचा शोध घेण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ५५ हजार ९२९ कारवाया, तीन वर्षांपासून फरार असलेल्या ३८ आरोपींना अटक, ऑनलाइन फसवणुकीतील १२ तक्रारदारांना रक्कम परत मिळवून देणे, तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत ६ कारवायांत १२ आरोपींना अटक करण्यात आल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या सर्व कारवायांमध्ये १९ कोटी १९ लाख १५ हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचा दावा जिल्हा पोलिस प्रशासनाने केला आहे. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड आणि पृथ्वीराज गायकवाड यांनी पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणावर शासन काय भूमिका घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.