Buldhana Mehkar Double Murder
बुलढाणा: गाढ झोपेत असलेली पत्नी व तिच्या कुशीत झोपलेल्या आपल्या चार वर्षीय मुलाची एका संशयी पतीने डोक्यावर कु-हाडीचे घाव घालून निर्दयीपणे हत्या केल्याची भीषण घटना मेहकर शहरात सोमवारी (दि. २९) पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. या थरारक घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. यातील खुनी पतीला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे.
या हत्याकांडाविषयी प्राथमिक माहिती अशी की, मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहुल हरी म्हस्के (वय ३३), पत्नी रुपाली (वय २८) व मुलगा रियांश (वय ४) वडील हरी गोविंद म्हस्के, आई ताराबाई व वृध्द आजी असा सहा जणांचा परिवार रहात होता. विवाहाच्या काही वर्षांनंतर संशयी वृत्तीचा राहुल हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी रुपालीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. यामुळे पती-पत्नीत वारंवार वाद होत असत.
अखेर संशयाने झपाटलेल्या राहुल याने सोमवारच्या पहाटे २ वाजताच्या सुमारास पत्नी रूपाली व चिमुकला मुलगा रियांश हे दोघेही गाढ झोपेत असल्याचे पाहून त्यांच्या डोक्यावर अमानुषपणे कु-हाडीचे सपासप घाव घातले. यावेळी भयंकर आवाजाने जागे झालेल्या ताराबाई यांनी शेजा-यांना मदतीसाठी हाक दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना पाहून घाबरलेल्या नातेवाईकांनी ११२ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करून घटनेची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार व एपीआय संदिप बिरांजे हे पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी आरोपी राहुल याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे. चिमुकला रियांश घटनास्थळीच गतप्राण झाला. तर अत्यवस्थ झालेल्या रूपालीला उपचारासाठी रूग्णालयात नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. या हत्याकांडामुळे मेहकर शहरात खळबळ व हळहळ व्यक्त होत आहे.