बुलढाणा : मलकापूर शहरात खून, प्राणघातक हल्ले, दरोडे व जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा उच्छाद मांडणाऱ्या संकेत उन्हाळे याच्यासह नऊ सराईत गुन्हेगारांच्या संघटित टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मलकापूर शहरातील संघटित गुन्हेगारीवर वचक बसून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संकेत सुनिल उन्हाळे (२२) याच्या टोळीत साहिल सुधाकर पालवे (१८), देव तिलकसिंग राजपूत (२४), अरविंद अजय साळुंके (१९), गणेश विजय वायडे (२१), कौशल संतोष घाटे (२२), आदित्य जनार्दन वानखेडे (२४), ऋषिकेश रामलाल इंगळे (२३) (सर्व रा. मलकापूर) तसेच हर्षल सुभाष घोंगटे (२३, रा. आव्हा, ता. मोताळा) यांचा समावेश आहे.
या टोळीने किरकोळ कारणावरून सतीश गजानन झाल्टे (रा. पिंप्राळा) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली होती. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना जबर मारहाणही करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी टोळीची सखोल चौकशी केली असता विविध पोलीस ठाण्यांत त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. मलकापूर शहर व परिसरात या टोळीची प्रचंड दहशत असल्याचेही निष्पन्न झाले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्याकडे पाठवला होता. सदर प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाल्याने मलकापूर शहरातील या ९ जणांच्या संघटित गुन्हेगारी टोळीवर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. या निर्णायक कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.