बुलढाणा : केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत राज्यातील पहिले १०० खाटांचे योगा व नैसर्गिक संशोधन शासकीय हॉस्पिटल लोणार येथे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने शासकीय स्तरावर हालचालींनी वेग घेतला आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने त्यांच्याच मतदारसंघातील लोणार येथे हॉस्पिटलला आवश्यक असलेली जागा पाहण्यासाठी सोमवार १० फेब्रुवारी रोजी केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था दिल्लीचे संचालक व चमू लोणार येथे येणार आहेत.
जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर व जागतिक 'अ' वर्ग दर्जाचे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या हॉस्पिटलच्या मंजूरीसाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून प्रस्ताव पाठवलेला आहे. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी दहा ते पंधरा एकर जमीन लागणार आहे.