बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला. नांदुरा तालुक्यातील लोणवडी, खडदगाव पिंपळखुटा धांडे व माळेगाव गोंड या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोणवडी गावात शेती सोबतच शेतकऱ्यांचे पशुधनही निसर्गाच्या भक्ष्यस्थानी पडून 30 ते 35 जनावरे दगावली. तर नांदुरा तालुक्यातील तूर, कपाशी, मका, ज्वार, फळबाग अशा एकूण 7843 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे बाधीत झाल्याने शेतकऱ्यांच लाखोंचे नुकसान झाले आहे. तर मुलाची औषधी आणण्यासाठी बाहेर गेलेला 28 वर्षीय तरुण पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून खामगाव, नांदुरा मोताळा या तालुक्यात कोसळधार पाऊस सुरु आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र हा पाऊस शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास देखील हिरावून घेत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. नांदुरा तालुक्यातील लोणवाडी ,खडदगाव, पिंपळखुटा धांडे व माळेगाव गोंड या चार गावात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतांचे तलाव झाले. नदीवर नाल्यांच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या लोणवाडी व खडदगाव येथील जनावरे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. वडनेर परिसरात 81.5 मिलिमीटर तर महालुंगे परिसरात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये 26 घरांची पडझड तर 76 जनावरे वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पावसामुळे नांदुरा शहर व ग्रामीण भागात पावसामुळे सोळा तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी महावितरणचा रोष व्यक्त केला. सोयाबीन व कपाशीचे पीक शेतात भरली असताना रात्री नांदुरा तालुक्यातील गावांमध्ये सतत तीन तास ढगफुटी सदृश्य पाऊस धो-धो कोसळला सकाळपर्यंत परिसरातील शेतामध्ये साचलेल्या पाण्यात पिके बुडाल्याने सोयाबीन, कपाशी व तूर पिकाचे नुकसान झाले. यामध्ये खडदगाव परिसरातील शेतामध्ये साचलेले पाणी विहिरीमध्ये उतरल्याने विहिर खचल्या, परिसरातील नदी व नाले काठावरील शेत जमीन खरडून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तर माटोडा येथील प्रशांत गजानन दांडगे (वय 28) हे मुलाची औषधी आणण्यासाठी गावलगतच्या वडी नाल्याच्या पुरातून मार्ग काढत काढताना वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला, सदर घटना माटोडा येथून दहिगाव येथे जात असताना घडली. माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ धाव घेत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, छोटा मुलगा, आई-वडिल असा परिवार आहे.
ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्यामुळे नेहमीच अत्यल्प जलसाठा असणारा लोणवाडी लघु प्रकल्प तुडूंब भरला आहे. या लघु प्रकल्पात 70 टक्के जलसाठा असून लघु प्रकल्पात मागील काही वर्षात दुसऱ्यांदा जलसाठा झाल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. ढगफुडी सदृश्य पावसामुळे लोणवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेताचे तलाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
जिल्ह्यामध्ये 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचून शेतीपिक, फळपिके तसेच जमीन वाहून/ खरडून गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील 12 गावे बाधीत झाले असून कापूस, सोयाबीन 462 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले, तर खामगाव तालुक्यात एका गावात कापूस, सोयाबीन 30 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. 24 सप्टेंबर रोजी नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे 7843 हेक्टर क्षेत्रावरील तूर, कपाशी, मका, ज्वारी, फळबागाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.