Dnyanganga Tiger Reserve 
बुलढाणा

Dnyanganga Tiger Reserve | बुलढाण्यातील 'धुरंधर' ला लवकरच मिळणार जोडीदारीण!

ज्ञानगंगा अभयारण्यात 'धुरंधर' वाघाला लवकरच मादी जोडीदार येणार. वन्यजीव उपवनसंरक्षक(वन्यजीव)यशवंत नागुलवार यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

बुलडाणा: जैववैविध्य स्थळ व वन पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात तीन महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या 'धुरंधर' वाघासाठी मादी जोडीदार लवकरच आणली जाणार आहे.अशी माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव)यशवंत नागुलवार यांनी दिली आहे.अलिकडेच ४ जानेवारी २०२६ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेला नर जातीचा तीन वर्षीय ( पीकेटी ७ सीपी-१) हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आता चांगला रूळला आहे.

इथल्या अनुकूल वातावरणाशी तो समरस झाला आहे.या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात 'धुरंधर' या टोपन नावाने ओळखले जात आहे. त्याला मादी जोडीदार आणण्याची सर्व कार्यवाही वरिष्ठ स्तरावर सुरू असून साधारणतः एका महिन्यात ज्ञानगंगा अभयारण्यात वाघिणीची भर पडेल. ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रातून बुलडाणा- खामगांव हा राज्यमार्ग क्र.२४ गेला आहे. अभयारण्यात वाघ,बिबटे,अस्वल,तडस,नीलगायी,चितळ आदी वन्यप्राणी मुक्तसंचार करतात.

अभयारण्यातून जाणा-या राज्य मार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांच्या धडकेने वन्यप्राण्यांचे अपघात झाल्याच्या घटना झाल्यामुळे दहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दि.१६जुलै २०१५ च्या आदेशानुसार, वन्यजीव संवर्धन व वनसंरक्षणाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत वाहतूकीसाठी बंदी घातलेली आहे.ती आजमितीस कायम आहे.मार्गावर वरवंड,गोंधनखेड,बोजा व खामगांव शहर सीमा अशा चार ठिकाणी वनउपज तपासणी नाके आहेत.

राज्य मार्गावर प्रवेशासाठी वाद घातल्यास होणार कारवाई

प्रतिबंधित वेळ रात्री १० ते पहाटे ५ वाजे दरम्यान चेकपोस्टवरील वनकर्मचा-यांशी वाद घालून काही वाहनधारक अभयारण्यातील मार्गावर प्रवेश मिळण्यासाठी वाद घालत असल्याचे प्रकार गंभीर समोर येत आहेत.अशा वाहनचालकांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार,दंड व शिक्षा करण्याची तरतूद आहे.संबंधितांवर यापुढे फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. यामुळे वाहनधारकांनी रात्रीच्या १० ते ५ या प्रतिबंधित वेळात ज्ञानगंगा अभयारण्यातून प्रवास टाळून बुलडाणा- वरवंड- उदयनगर-खामगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT