बुलढाणा

Buldhana DCC Bank news : बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेवर केंद्रीय मंत्री जाधव व माजी मंत्री डॉ. शिंगणे बिनविरोध

तब्बल सोळा वर्षांनंतर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू, १९ जागांसाठी २१४ उमेदवार रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

Buldhana DCC Bank news

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : तब्बल सोळा वर्षांनंतर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांतच केंद्रीय मंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव व माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे हे दोन कट्टर विरोधक संचालकपदावर अनुक्रमे मेहकर व सिंदखेडराजा कृषी पतपुरवठा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. आता संचालकांच्या उर्वरित १९ जागांसाठी एकूण २१४ उमेदवार रिंगणात असून नामांकन माघार घेण्याची मुदत १२ ऑगस्टपर्यंत आहे.

सहकार क्षेत्रातील दिग्‍गजांसह राजकीय कुटुंबातील उमेदवारच निवडणूक रिंगणात

सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज व राजकीय परिवारातील उमेदवारच निवडणुकीत मोठ्या संख्येने उतरलेले दिसत आहेत. यामध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड व त्यांचे जावई मयूर बाहेकर, आमदार श्वेताताई महाले, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व त्यांच्या पत्नी अर्पिता शिंदे, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार धृपतराव सावळे व त्यांच्या पत्नी पद्मावती सावळे व भाऊ राजू सावळे, माजी आमदार राजेश एकडे, माजी आमदार तोताराम कायंदे व त्यांचे पुत्र शिवराज कायंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत व त्यांच्या पत्नी कमल बुधवत, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पत्नी राजश्री जाधव व भाऊ उल्हास जाधव, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नी वृषाली बोंद्रे, जि. प. चे माजी अध्यक्ष नरेंद्र खेडेकर आदी दिग्गज व महत्त्वाकांक्षी नेत्यांची फळीच बँकेच्या निवडणूक मैदानात उतरली आहे.

संचालकांच्या १९ जागांसाठी निवडणूक

कृषी प्रक्रिया व पणन, नागरी बँका व पतसंस्था, अन्य सहकारी संस्था, महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जाती या पाच मतदारसंघांतून तसेच बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, देऊळगाव राजा, लोणार, जळगाव जामोद, संग्रामपूर या ११ तालुक्यांच्या कृषी पतपुरवठा मतदारसंघातून संचालकांच्या १९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

माघारीनंतरच निवडणुकीतील लढतीचे चित्र स्‍पष्‍ट होणार

नामांकन असलेले २१४ इच्छुक उमेदवार असून नामांकन माघार घेण्याची मुदत संपल्यावरच निवडणुकीतील बिनविरोधाचे वा लढतीचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. राजकीय व सहकार क्षेत्रातील अनेक प्रस्थापित नेत्यांनी जिल्हा बँकेचे संचालक पद पटकावणे हा प्रतिष्ठेचा विषय केला असल्याने येत्या काळात निवडणुकीला चांगलाच रंग भरला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT