बुलढाणा : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदांच्या २१पैकी उर्वरित ९जागांसाठी आज रविवारी जिल्ह्यातील १३ केंद्रांवर मतदान झाले. एकूण १८५७ पात्र मतदारांपैकी १७५१ (९४.३टक्के)मतदारांनी आपला हक्क बजावला.
आजच्या निवडणूकीत महिला,अ.जा.अ.ज.,इतर सहकारी संस्था,ओबीसी,नागरी बॅंक-पतसंस्था मतदारसंघ व मलकापूर, संग्रामपूर आणि लोणार कृषी सेवा सोसायटी मतदारसंघ अशा ९जागांसाठी २३उमेदवार रिंगणात होते. 'सहकार पॅनल' व 'स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल 'यांच्यातील अटीतटीच्या लढतींकडे जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.'सहकार पॅनल' ने आठ जागा, 'शेतकरी परिवर्तन पॅनल'ने सात जागा तर अपक्ष उमेदवार आठ जागा असे एकूण २३ उमेदवार मैदानात होते.
'राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आमदार मनोज कायंदे प्रणित 'स्व.अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल'ला बळ दिले. स्वत: उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री मकरंद पाटील हे 'शेतकरी परिवर्तन पॅनलच्या पाठीमागे उभे राहिले. तर सहकार पॅनल' मध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव. कामगारमंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले व माजी आमदार डाॅ.राजेंद्र शिंगणे आदी नेत्यांची मोठी फळी उभी होती. त्यामुळेच लढत चुरशीची व प्रतिष्ठेची झाली.
असे झाले मतदान
या निवडणूकीत आज झालेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील १३ कृषी सेवा सोसायटी मतदारसंघातील ५६३ पैकी५५५ (९८.६)मतदारांनी मतदान केले. इतर सहकारी संस्थांच्या एकूण ३१ (१००टक्के ) मतदारांनी मतदान केले. कृषी प्रक्रीया व पणन मतदारसंघातील २५ पैकी २४ (९६टक्के)मतदारांनी मतदान केले. नागरी बॅंक-पतसंस्था-वैयक्तिक मतदार संघातील १२३८ पैकी ११४१(९२.२टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला.अशाप्रकारे एकूण १८५७ पैकी १७५१(९४.३टक्के) मतदान झाले.
तालुकानिहाय झालेले मतदान
बुलढाणा-८९.५,चिखली-९५.२, मलकापूर-९४.७, मोताळा-९५.३, नांदूरा-९५.८, शेगांव-९४.२, खामगांव-९४.२, जळगाव जामैद-९१.३, संग्रामपूर-९१.२, मेहकर-९७.२, लोणार-९८.१, सिंदखेड राजा-९७.७ आणि देऊळगाव राजा- ९६.५ अशा प्रकारे मतदान नोंदले गेले आहे. उद्या सहकार मंदिर संकुलात मतमोजणी होणार असून जिल्हावासियांचे त्याकडे लक्ष वेधले आहे.