बुलढाणा: जिल्ह्यातील नांदूरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला नोव्हेंबर २०२५मध्ये डिजीटल अरेस्ट केल्याची भिती दाखवून तब्बल २ कोटी रूपये उकळून फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचे धागे बुलढाणा सायबर पोलिसांनी शिताफीने उकलले आहेत. तीन भामट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातील ५२ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल गोठवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा केंद्रबिंदू राजस्थान राज्यात असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नांदूरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला आठ महिन्यांपूर्वी, डिजीटल अरेस्ट केल्याची भिती दाखवून अज्ञात भामट्यांनी त्यांच्याकडून २कोटी रूपये उकळून फसवणूक केली होती.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक गजानन कांबळे, एएसआय शकील खान, पोका. प्रशांत गावडे, राजदीप वानखडे, विक्की खरात, राजू आडवे, कैलास ठोंबरे, राहूल इंगळे, क्षितिज तायडे, शुभम बोराडे आदींच्या तपास पथकाने या डिजीटल अरेस्ट फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींचे प्राप्त जीमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच गुन्ह्यातील संबंधित सर्व बॅंक डिटेल्स तपासून गुन्ह्यातील पहिला संशयित आरोपी शुभम नांगल रा.अहिल्यानगर याला ३ऑगस्ट २०२६ रोजी शिताफीने अटक केली.
तपासादरम्यान आरोपी नांगल याने दिलेल्या माहितीच्या आधारे बुलढाणा सायबर पोलिसांच्या पथकाने मुंबई येथे पाळत ठेवून व पाठलाग करून गुन्ह्यातील अन्य दोन संशयित आरोपी धनराज उर्फ राॅबीन विष्णाराम बिष्णोई (वय२१,रा.जोधपूर, राजस्थान)आणि मुनाफ शेख अन्वर शेख (वय२३,रा.अहिल्यानगर) या दोघांना ५लाख रूपयांचा चेक 'विड्राॅल' करतांना रंगेहाथ पकडले. तपास पथकाने आरोपी धनराज व मुनाफ या दोघाही अट्टल भामट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना बुलढाण्यात आणले.या कारवाईमध्ये आतापर्यंत एनसीसीआरपी पोर्टलवर ३१लाख रूपये तसेच आरोपी शुभम नांगल याच्या गोल्ड लोन खात्यात १४लाख
आणि राॅबीन व मुनाफ हे चेक विड्राॅल करतानाचे ५लाख रूपये, एमआरएम पोर्टल माध्यमातून १ लाख पन्नास हजार रू. व आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेले एपल व एन्ड्राॅईड मोबाईल किंमत १ लाख २७हजार रू.असा एकूण ५२लाख ७७हजाराचा मुद्देमाल गोठवण्यात आला आहे. गुन्ह्यातील उर्वरित रक्कमही पिडीत ज्येष्ठ नागरिकाला परत मिळवून देण्याचे सायबर पोलिसांचे प्रयत्न चालले आहेत.