मृत वडील व आरोपी मुलगा  
बुलढाणा

Buldhana Crime | वडील बेपत्ता झाल्याची तक्रार देणारा मुलगाच निघाला मारेकरी!

हतेडी खुर्द येथील घटना : खून करुन प्रेत घराजवळील शेतात जाळले

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा: वडील बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार देणारा मुलगाच त्यांचा मारेकरी निघाल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली. राहत्या घरातच जन्मदात्या वडिलांना जीवे मारून घराजवळील शेतात त्यांचे प्रेत जाळणा-या आरोपी मुलाला बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हतेडी खुर्द येथील शेतकरी समाधान पुंजाजी घायवट (४४)हे ८मे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मोठा मुलगा अनिकेत घायवट (२१)याने बुलढाणा ग्रामीण पोलिसांत दिली होती. तपासादरम्यान, पोलिसांना अनिकेत याची देहबोली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अनिकेतच्या मित्राकडे चौकशी केली असता,घटनेच्या दिवशी कुटुंबातील अन्य सदस्य नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेलेले होते.

वडिल समाधान व मुलगा अनिकेत हे दोघेच घरी होते. रात्री दीड वाजताच्या सुमारास या दोघांत काही कारणावरून वाद झाला. दोघांत झटापट झाली, वाद विकोपाला गेला. यावेळी मुलगा अनिकेत याने वडिलांच्या छातीवर जोराने लाथ मारल्याने जागीच कोसळून ते गतप्राण झाले. वडिलांच्या हत्येचा गुन्हा दडवण्यासाठी अनिकेत याने त्याच रात्री त्यांचे प्रेत घराजवळील शेतात जाळून टाकले.

जणू काहीच घडले नाही अशा आविर्भावात वावरणा-या अनिकेत आपल्या कुटुंबियांची दिशाभूल केली व वडिल घरी आले नाहीत, बेपत्ता झाले आहेत अशी तक्रार बुलढाणा ग्रामीण पोलिसांत दिली.तपासादरम्यान,ठाणेदार गजानन कांबळे यांनी घटनेच्या दिवशी वडिल व मुलगाच घरी होते आणि मुलगा अनिकेत याची देहबोली संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता आपणच वडिलांना जीवे मारून त्यांचे प्रेत जाळून टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. वडिलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी अनिकेत घायवट याला अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT