बुलढाणा : मध्यप्रदेशातील बु-हाणपूरकडून आलेला एक संशयास्पद ट्रक नाकाबंदीद्वारे अडवून पोलिसांनी ट्रकमधील सुमारे ५० लाख १३ हजार रूपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला.
या कारवाईत २० लाखांचा ट्रकही जप्त केला असून आरोपी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. सुरूर अहमद नुर अहमद (रा.फिरदोस काॅलनी अकोला) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. हा अवैध गुटखा अकोला मार्गाने पुढे नेला जाणार असल्याची माहिती चालकाच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, १३ जूनच्या रात्री ९.३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे पथक गस्तीवर असतांना त्यांना मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर मार्गाकडून बुलढाणा जिल्ह्य़ात जळगाव जामोद परिसरात आलेल्या एका ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरवंट बकाल ते शेगाव मार्गावर एका बेकरीजवळ नाकाबंदी केली. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास संशयित ट्रक (क्र.एमएच - ४० जीटी ५९६५) हा ट्रक अडवून झाडाझडती घेतली असता विविध कंपन्यांचा अवैध गुटखा,पानमसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण ५० लाख १३ हजार ९२० रूपये किंमतीचा प्रतिबंधित मालाचा मोठा साठा आढळून आला. गुटख्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेला २० लाखांचा ट्रकही या कारवाईत जप्त करण्यात आला.
पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, उपनिरीक्षक सुनिल राऊत, पोहेका सुधाकर थोरात,योगेश कुंवारे, मंगेश सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली. शेगाव पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.