Buldhana Illegal Sand Transport Pudhari
बुलढाणा

Buldhana Illegal Sand Transport |बुलढाण्यात अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; चार टिप्पर जप्त

चार चालक ताब्यात; रेतीसह तब्बल १ कोटी १० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Buldhana Illegal Sand Transport Tippers Seized

बुलढाणा : गौण खनिज रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चार टिप्परवर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. ११) कारवाई केली. अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायणखेड शिवारातून अवैध रेतीची वाहतूक करणारे चार टिप्पर पकडण्यात आले. या कारवाईत चारही चालकांना ताब्यात घेण्यात आले असून, १४ ब्रास अवैध रेती आणि चार टिप्परसह तब्बल १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नारायणखेड शिवारातून काही व्यक्ती टिप्परद्वारे रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे, एपीआय यशोदा कणसे आणि पीएसआय प्रताप बाजड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने देऊळगावराजा-चिखली मार्गावरील अंढेरा फाट्यावर सापळा रचला.

नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना नारायणखेड शिवाराकडून रेती भरून आलेले चार टिप्पर पोलिसांनी अडवले. त्यामध्ये एमएच २८ बी ८९५२, एमएच २८ बीबी ७२९९, एमएच २८ एबी ७५०९ आणि एमएच २८ एबी ७६१४ या वाहनांचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान चारही टिप्परमध्ये अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेली एकूण १४ ब्रास रेती, किंमत ८४ हजार रुपये, आढळून आली. तसेच अंदाजे १ कोटी १० लाख रुपये किमतीचे चार टिप्पर जप्त करण्यात आले.

या प्रकरणी टिप्परचालक रविंद्र साहेबराव इंगळे (३१), विष्णू उत्तम इंगळे (४०), आतिश जयवंता मादनकर (४२) आणि प्रसाद पंडित मुरडकर (२५) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच गौण खनिज अधिनियमातील तरतुदींनुसार अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT