बुलढाणा,: सार्वजनिक न्यास नोंदणी बुलढाणा विभाग कार्यालयातून संस्था नोंदणीसाठीची कोरी प्रमाणपत्रे चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मादाय व विश्वस्त संस्थांची नोंदणी करणा-या बुलढाणा न्यास नोंदणी कार्यालयातून महत्वाची असलेली कोरी प्रमाणपत्रे चोरीला गेल्याचे दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी निदर्शनास आले.
संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत देण्यात येणाऱ्या संस्था नोंदणी प्रमाणपत्रांपैकी अनुक्रमांक १२१९९८ ते १२२००० अशी तीन कोरी प्रमाणपत्रे चोरीस गेली आहेत. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे चोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरील अनुक्रमांकांची प्रमाणपत्रे वापरून शासकीय किंवा निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सर्व कार्यालये, बँका व संस्थांनी दक्षता घ्यावी. सदर उल्लेखित अनुक्रमांकांची प्रमाणपत्रे कुणाच्या वापरात आढळून आल्यास, त्यांची तात्काळ उलट तपासणी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुलढाणा येथे करून घ्यावी किंवा या कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त यांनी केले आहे.