बुलढाणा: जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यास्तव नियमांचे पालन होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी सक्त आदेश जारी केले असतांनाही चिखली शहरातील रेणूका पेट्रोलपंपावर प्लास्टिक बॉटल्स, कॅन आणी पाण्याच्या टाक्यांमध्ये पेट्रोलची बिनदिक्कतपणे विक्री होत असल्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
अखेर चिखली शहरातील संबंधित पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी डॉ .किरण पाटील यांनी, पेट्रोलियम अधिनियम २००२ नुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप व डिझेल पंप मालकांसाठी लिखित आदेश जारी करुन अधिनियमांचे काटेकोर पालन करण्याचे बजावले होते व पेट्रोल-डिझेलची विक्री करतांना कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील अशी तंबी दिली होती. टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी सर्वत्रच वाहनधारकांची झुंबड उडत होती.जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार,पेट्रोल व डिझेल हे केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे.
चिखली येथे जालना मार्गावर असलेल्या 'रेणुका पेट्रोल पंप' येथे दि. २६ मार्च २०२६ रोजी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून ग्राहकांना खुल्या टाक्या आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल ह्या द्रवरूप इंधनाची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले.एका ग्राहकाने तर पाणी साठवण्याची नवी प्लास्टिक टाकी एका चारचाकी वाहनांतून आणून २०० लिटर डिझेल भरुन घेऊन गेला.
याच पंपावर प्लास्टिकच्या मोठमोठ्या कैन्समध्ये पेट्रोल व डिझेलची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आल्याने समाजमाध्यमांवर जिल्हा प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. अखेर तहसील कार्यालय चिखली येथील पुरवठा निरीक्षक रविंद्र संजय वाघ यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये संबंधित 'रेणूका पेट्रोल पंप' मालकाविरूध्द तक्रार दाखल केली.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ आणि २८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार कैलास चाटारकर या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पेट्रोल पंप चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे.चिखली शहरात कारवाई झाल्यानंतर जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकात खळबळ उडाली आहे.