आरोपी पती डॉ.गजानन टेकाळे, मृत पत्‍नी माधुरी टेकाळे  Pudhari Photo
बुलढाणा

बुलढाणा: 'त्या' कथित दरोड्याचे बिंग फुटले; पशुवैद्यकीय डॉक्टर पतीने झोपेतच पत्नीला संपवले

Buldhana Crime News | अनैतिक संबधास अडथळा ठरणाऱ्या पत्‍नीचा काढला काटा

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा:

मोताळा तालुक्यातील दाभाडी गावातील दहा दिवसांपूर्वीच्या कथित दरोड्याचे बिंग फुटले आहे. खासगी पशू वैद्यकीय चिकित्सकाने आपल्या घरात दरोडा पडल्याचा बनाव केला आणि झोपेच्या गोळ्या देऊन तोंडावर उशी दाबून पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अनैतिक संबंधात पत्नीचा अडसर येत असल्याने कट रचून तीला झोपेतच जीवे मारल्याप्रकरणी आरोपी डॉ.गजानन टेकाळे याला बोराखेडी पोलीसांनी गजाआड केले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दाभाडी गावात खासगी पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ.गजानन टेकाळे, पत्नी माधुरी व मुलगी वेदिका असे तीघांचे कुटुंब राहत होते. १९जानेवारीच्या सकाळी टेकाळे यांच्या घरात दिसून आलेले दृश्य पाहून शेजारी व ग्रामस्थ हादरुन गेले होते. माधुरी टेकाळे ह्या मृतावस्थेत तर पती डॉ.गजानन हे बेशुद्धावस्‍थेत दिसून आले होते. त्यांच्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसत होते , दागदागिने , रोख रक्कम दिसून आली नव्हती एकुणच ही दरोड्याची घटना असावी असा प्रथमदर्शनी अंदाज बांधला गेला होता. टेकाळे दाम्पत्याची मुलगी वेदीका ही शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शिर्डीला गेलेली असल्याने घटनेच्या रात्री घरी नव्हती.

कथित दरोड्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. श्वानपथक व ठसे तज्ञांना काहीही धागा हाती लागला नव्हता. टेकाळे यांच्या घराचे दरवाजे व कडीकोंडे तुटलेले नव्हते. मृत माधुरी यांचा चेहरा काळा पडलेला होता. रक्ताचा थेंबही कुठे दिसून आला नाही. गजानन याच्या मोबाईल मध्ये एका तरुणीसोबतचे आक्षेपार्ह फोटो दिसून आले. मामला काहीतरी वेगळाच असावा! पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हे हेरले होते. तथापि तपासासाठी पोलीसांची तीन पथके नेमली होती. घरात गुंगलेल्या अवस्थेत आढळलेल्या डॉ.गजानन टेकाळे यास जळगाव खान्देश येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी डॉ.गजानन याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने त्याच्या कर्माचा पाढा वाचला.

गजानन याचे पत्नीच्या नात्यातील एका तरुणीशी सहा वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. त्या तरुणीने विवाह करण्यासाठी डॉ.गजाननवर दबाव वाढवला पण यात पत्नी माधुरीचा अडसर येत असल्याने तीलाच कायमचे संपवण्याचा कट रचला.१८जानेवारीला रात्री डॉ .गजानन याने पत्नी माधुरीच्या एसिडीटीच्या चुर्णामध्ये नकळतपणे झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली. चुर्ण खाल्ल्यानंतर माधुरी झोपायला गेल्या.' त्या' गोळ्यांच्या प्रभावामुळे प्रचंड गुंगी आलेल्या माधुरी यांच्या तोंडावर उशी दाबून पती गजाननने त्यांना जीवे मारले. दरोडा पडल्याचा बनाव केला, कपाट अस्ताव्यस्त करून व स्वतःही झोपेच्या काही गोळ्या खावून बेशुध्दावस्थेचा देखावा केला. सुरूवातीला ही दरोड्याची घटना वाटली पण पोलिस तपासात बिंग फुटले आणि खुनी डॉक्टर पतीचा कारनामा उजेडात आला. या घटनेने लोकांना प्रचंड धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT