Buldhana police seized 800 kg cannabis disposal
बुलढाणा: पोलिसांनी विविध कारवायात जप्त केलेले अंमली पदार्थ कुठे ठेवले जातात?पुढे त्यांचे काय होते?असे कुतूहलाचे प्रश्न लोकांना अनेकवेळा पडत असतात.याविषयी उकल करणारी माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांनी ११ ठिकाणी जप्त केलेल्या ८०० किलो गांजाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन क्षेत्रात एनडीपीएस कायद्यानुसार ११ गुन्ह्यात जप्त केलेला प्रतिबंधित अंमली पदार्थ असलेला ८०० किलो ६४६ ग्राम गांजा केंद्रीय गोदामात संकलित करण्यात आला होता. जिल्हा पोलिस दलाने आता तो साठा रितसर नष्ट केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या 'मिशन परिवर्तन मोहिमे'त २६ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या सव्वातीन महिन्याच्या काळात पोलिसांच्या ११ कारवायांत हा गांजा जप्त करण्यात आला होता.
पोलिस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मुंबई यांच्या निर्देशानुसार,जप्त केलेला अंमली पदार्थ गांजाची कायदेशीर निकष व नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्राधिकृत केलेल्या बुटीबोरी (जि. नागपूर) येथील ड्रग्ज डिस्पोजल युनिटमध्ये गांजाची विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी जिल्हास्तरीय ड्रग्ज डिस्पोजल समितीचे सदस्य व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (गृह) बाळकृष्ण पावरा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.