बुलढाणा: महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाइन १०९८ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा यांच्या संयुक्त प्रयत्नातून मागील एका महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २४ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासनाने विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रभावीपणे कारवाई करत “ॲक्शन मोड”मध्ये काम केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
चाईल्ड हेल्पलाइन बुलढाणा टीममधील प्रकल्प समन्वयक, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, केस वर्कर प्रवीण गवई, मुकेश मोरे व राहुल सुरडकर यांनी गावपातळीवर ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर तसेच संबंधित पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही केली.
तक्रार प्राप्त होताच चाईल्ड हेल्पलाइन पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन संबंधित पोलीस ठाणे, पोलीस हेल्पलाइन ११२, ग्रामीण व शहरी भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि अंगणवाडी यंत्रणा यांच्या समन्वयाने बालविवाह थांबविले. तसेच संबंधित मुलींचे समुपदेशन करून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा व शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तालुकानिहाय रोखण्यात आलेले बालविवाह :
चिखली – ५, देऊळगाव राजा – ४, सिंदखेड राजा – ४, लोणार – ३, मेहकर – २, मोताळा – २, बुलढाणा – २, मलकापूर – १, खामगाव – १.