Ancient temple of Goddess Kamalja submerged in water; idol of the Goddess in a shed
मयुर गोलेच्छा
लोणार : निसर्गाचा अद्भुत चमत्कार, प्राचीन मंदिरांचा आध्यात्मिक वारसा आणि शतकानुशतके जपलेली श्रद्धेची परंपरा यांचा अनोखा संगम असलेल्या येथील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील वाढत्या जल पातळी मुळे ऐतिहासिक कमळजा मातेचे मंदिर जलमय झाले आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात इतिहासात प्रथमच पंचक्रोशीतील भाविकांना मूळ मंदिरात जाऊन कमळजा मातेचे दर्शन घेता येणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र, भाविकांच्या श्रद्धेला आणि दर्शनाच्या अखंड परंपरेला खंड पडू नये, यासाठी येथील कमळजा सेवा संघाच्या सदस्यांनी पुढाकार घेत सरोवराच्या काठावर तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून कमळजा मातेच्या प्रतिमेची स्थापना केली आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवातही भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.
लोणार सरोवर म्हणजे केवळ निसर्गनिर्मित जलाशय नाही, तर निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि श्रद्धेने नटलेला अनमोल वारसा आहे. वर्षानुवर्षे नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविकांकडून जपली जाते. मात्र, यंदा सरोवरातील जलपातळी वाढल्याने मंदिर पाण्याखाली गेले असून मूळ मंदिरात प्रवेश करणे शक्य राहिलेले नाही.
कमळजा मातेवरील भक्तीचा दीप यंदाच्या नवरात्रोत्सवातही अखंड तेवत राहणार आहे. दरम्यान, लोणार सरोवरातील वाढत्या जलपातळीच्या पार्श्वभूमीवर कमळजा माता मंदिरासह परिसरातील प्राचीन धार्मिक वास्तूंच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी पुरातत्त्व, पर्यावरण आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
एका बाजूला निसर्गाचा चमत्कार, दुसऱ्या बाजूला श्रद्धेचा जागर !
लोणार सरोवराच्या वाढलेल्या जलपातळीमुळे एकीकडे निसर्गाचे वेगळे रूप पाहायला मिळत असताना दुसरीकडे प्राचीन मंदिरांचे अस्तित्व आणि त्यांचे संवर्धन हा महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे. सरोवराच्या काठावरील ऐतिहासिक मंदिरांचा वारसा जतन करणे ही काळाची गरज बनली आहे. कमळजा माता मंदिर पाण्याखाली गेल्याने भाविकांच्या धार्मिक भावनांबरोबरच या ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणाचा प्रश्नही अधोरेखित झाला आहे.
मंदिर जलमय झाले, मात्र श्रद्धेचा दीप अखंड तेवत राहणार !
मूळ कमळजा माता मंदिर पाण्याखाली गेले असले तरी देवीवरील भाविकांची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. उलट, कमळजा सेवा संघाच्या सदस्यांनी केलेल्या पर्यायी व्यवस्थेमुळे श्रद्धा, एकजूट आणि सेवाभावाचे दर्शन घडले आहे. निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीपुढे मंदिरातील प्रत्यक्ष दर्शनाचा मार्ग बंद झाला असला, तरी प्रतिकूल परिस्थितीत ही भाविकांच्या श्रद्धेचा मार्ग मात्र खुला ठेवण्यात कमळजा सेवा संघाला यश आले आहे.