देऊळगाव राजा : सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक श्रीमंत लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात नुकतीच सापडलेली समुद्रमंथनाची प्राचीन मूर्ती अखेर सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. 12 जानेवारीपासून या दुर्मिळ व ऐतिहासिक मूर्तीचे दर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पुढील काळातही ही मूर्ती दर्शनासाठी खुली राहणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या मौल्यवान ऐतिहासिक ठेव्याच्या जतन व संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या मूर्ती संग्रहालयाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सिंदखेडराजा हे शहर गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असल्याचे सांगितले. येथे सापडलेली समुद्रमंथनाची मूर्ती ही परिसराच्या सांस्कृतिक व पुरातत्त्वीय वारशात मोलाची भर घालणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या संग्रहालयाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना इतिहासाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होणार असून, सिंदखेडराजाच्या ऐतिहासिक ओळखीला नवी ऊर्जा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ही मूर्ती सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी छत्रपती मराठा सेना संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी कार्यकर्त्यांसह 9 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी अशोक राजे जाधव, दीपक किंगरे, बाळासाहेब शेळके, गुलाबराव राठोड, अतिश राजे जाधव, शंकर शिंदे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत शासन व प्रशासनाकडे ठोस मागणी करण्यात आली होती. या मागणीची संबंधित विभागाने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समुद्रमंथनाची प्राचीन मूर्ती नागरिकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली.
या निर्णयाचे महेश डोंगरे यांनी स्वागत केले.12 जानेवारी रोजी झालेल्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने जिजाऊ भक्त, इतिहासप्रेमी, देशभरातून आलेले भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी या मूर्तीचे दर्शन घेतले.
शासनाची दखल
दैनिक पुढारीने या विषयावर 10 जानेवारी रोजी केलेल्या बातमीची शासन व प्रशासनाने दखल घेतल्याने हा ऐतिहासिक ठेवा सर्वसामान्यांसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला. या संग्रहालयामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच सिंदखेडराजाची ऐतिहासिक ओळख अधिक भक्कम होईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.