Nana Patekar first lead role vidarbh Pudhari photo
बुलढाणा

'राघू मैना'तील 'राघू' आज उडून गेला! नाना पाटेकरांना नायक म्हणून पहिली संधी देणारी विदर्भाची 'ती' खास आठवण

Nana Patekar first lead role - 'राघू मैना'तील 'राघू' आज उडून गेला! नाना पाटेकर यांना नायक म्हणून पहिली संधी दिली विदर्भाने

पुढारी वृत्तसेवा

विजय देशमुख, बुलढाणा :

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीही शोकाकूल झाली आहे. सहनायक, नायक, खलनायक, चरित्रनायक अशा किती तरी अभिनयाच्या पैलूतून नाना हे भारतीय चित्रपटसृष्टीत एक सशक्त अभिनेते म्हणून नाव मिळवले. पण नानांना नायक म्हणून पहिली संधी आणि ओळख विदर्भाने दिली होती हे वाचून ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे.

अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॅडी देशमुख यांनी १९८२मध्ये 'राघूमैना'या रंगीत मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्यात नायक म्हणून नाना पाटेकर तर नायिका मधू कांबीकर अशी जोडी होती. अशोक सराफ, निळू फुले हे दिग्गज कलाकार ही त्यात होते.नायक म्हणून नवख्या नाना पाटेकर यांना संधी देण्याचे धाडसच निर्माते डॅडी देशमुख यांनी केले होते.

नानांचा मुख्य भूमिकेतील हा पहिलाच चित्रपट होता. त्याआधी 'गमन'(हिंदी१९७८)व सिंहासन (१९७९)भालू(१९८०)या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून नाना होते. त्या तीनही चित्रपटांच्या श्रेयनामावलीत शेवटी बारीक अक्षरात नाना पाटेकर नाव दिसायचे. डॅडी देशमुख यांनी १९७७मध्ये संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर 'देवकी नंदन गोपाला' या कृष्णधवल व यशस्वी चित्रपटाची निर्मिती केलेली होती. त्याचे दिग्दर्शक राजदत्त होते.'राघूमैना' चित्रपटासाठी नायक म्हणून राजदत्त यांनी डॅडी देशमुखांना नाना पाटेकर यांचे नाव सुचवले.

विठ्ठल वाघ, श्रीकृष्ण राऊत व डॅडी देशमुख यांनी 'राघूमैना'ची गाणी लिहिली. तर पटकथा वसंत सबनीस यांनी. लोककलावंताच्या प्रेमकथेची शोकांतिका अशी थीम असलेल्या त्या चित्रपटात अभिनेत्री मधू कांबीकर (मैना)च्या सोबतीने नाना(राघू)ची ट्यूनिंग जमली. नायक म्हणून प्रथमच संधी मिळाल्याने नानाने अभिनयात जीव ओतला. एका फिरत्या तमाशा फडात ढोलकी वाजवणारा राघू व त्यातीलच नृत्य कलावंतीण मैना या दोघांत प्रेम होते.

फडाला पैसा पुरवणारा सावकार (निळू फुले)याचा देखण्या 'मैना'वर डोळा असतो. राघू व मैनात प्रेम फुलल्याचे पाहून सावकार हा राघूला कर्जाच्या जाळ्यात अडकवतो. सावकाराच्या जाचाला कंटाळून राघू व मैना फड सोडून निघून जातात. स्वतःचा संसार थाटण्याचा प्रयत्न करतात. पण समाज त्यांना स्वीकारत नाही. तमाशातील बाई म्हणून गावक-याकडून मैनेची अवहेलना होते. शेवटी राघूला संघर्ष करावा लागतो. प्रेम, वंचना, समाजाची बंधने यामुळे कथा शोकांतिकडे झुकते. ढोलकी वाजवणारा राघू शेवटी बंदूक हातात घेतो. त्याकाळातील ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलावंताच्या जीवनाचे वास्तव चित्रण 'राघूमैना'तून मांडले गेले.

अकोला, चिखलदरा, पातूर, लोणार या ठिकाणच्या चित्रीकरणातून अस्सल ग्रामीण बाज चितारला गेला होता. विदर्भाच्या मातीत तयार झालेल्या 'राघूमैना'ला दादासाहेब फाळके उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (१९८३-८४),तर नाना पाटेकर यांना उत्कृष्ट अभिनेता शिवाजी गणेशन पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक-राजदत्त, उत्कृष्ट पटकथा-वसंत सबनीस, उत्कृष्ट कलादिग्दर्शन-किशोर मोरे अशा प्रतिष्ठित पुरस्कारांवर मोहर उठवून ''राघू-मैना" हा अस्सल ग्रामीण प्रेमकथेवरील चित्रपट ८०च्या दशकात तरुणाईने डोक्यावर घेतला होता. नाना पाटेकर यांना नायक म्हणून पहिली ओळख 'राघूमैना'या मराठी चित्रपटाने दिली होती.

नानाच्या चित्रपट कारकिर्दीसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. आपल्या सकस अभिनयाने नाना पाटेकर यांनी क्रांतिवीर, प्रहार, तिरंगा, अंकूश, यशवंत, नटसम्राट अशा कित्येक चित्रपटांतून यशोशिखर गाठले. नानांनी आज अकस्मात घेतलेली एक्झिट सर्वांनाच चटका लावून गेली आहे. विदर्भाच्या मातीनेही 'राघूमैना' चित्रपटाद्वारे हा हिरा सर्वप्रथम हेरला होता. हे सांगणे विदर्भासाठी अभिमानास्पद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT