बुलढाणा : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलढाणा शहरात १९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी २१ महापुरूषांच्या स्मारकांचे लोकार्पण होणार आहे. जय्यत तयारी झालेल्या या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत "जातीय महापुरूषांच्या.." असा उल्लेख केला असल्याने लोकांच्या चर्चेत आलेली ही पत्रिका वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
आठ पानांची रंगीत निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे .त्यात सुरूवातीलाच "...सर्वजातीय महापुरुषांच्या स्मारकाचे लोकार्पण होत असताना अत्यंत आनंद होत आहे ". असा उल्लेख आहे. सकल मानव समाजाला संत महात्म्यांनी, थोरपुरूषांनी समतेची, सामाजिक न्यायाची, शांतीची, अहिंसेची व्यापक शिकवण दिली आहे.
"सर्वजातीय महापुरुष"असा चुकिचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत केला कसा? यावर लोकांत सखेद आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महापुरूषांना जातीय कोंदणात बसविण्याचा संकुचित दृष्टिकोन यातून प्रतित होत असल्याने ही गंभीर चुक समजली जात आहे. या पत्रिकेत निमंत्रक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे नाव आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने नगर परिषदेच्या माध्यमातून बुलढाणा शहरात एकूण २६ महापुरुषांची स्मारके उभारण्यात आली आहेत. यामुळे पुतळ्यांचे शहर अशीच बुलढाण्याची ओळख निर्माण होऊ पहात आहे.
१९सप्टेंबरला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक तसेच छ.संभाजी महाराज, छ.शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, महर्षी वाल्मिकी, अग्रसेन महाराज, भगवान महावीर, संत गाडगेबाबा, संत रविदास, जिजाऊ मांसाहेब व बाल शिवबा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, वीर एकलव्य, वसंतराव नाईक आदी २१महापुरूषांची स्मारके शहरातील चौकाचौकात व मोक्याच्या शासकीय जागांवर उभारण्यात आली आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे लोकार्पण अलिकडेच झाले आहे.
बाळासाहेब ठाकरे, संत सेवालाल महाराज, चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या स्मारकांची कामे प्रगतीपथावर आहेत. तर महाराणा प्रतापसिंह व संत भगवानबाबा यांची स्मारके प्रस्तावित आहेत. २१स्मारकांच्या लोकार्पणाची निमंत्रण पत्रिका ही चुकीच्या उल्लेखामुळे चर्चेत आली आहे. आयोजक त्यात काय सुधारणा करतात? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.