विदर्भ

बुलढाणा : आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणी घोटाळा; ४ लिपिकासह एजंटवर गुन्हा दाखल

अविनाश सुतार

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा एआरटीओ कार्यालयातील चार लिपिक व बाहेरील एका दलालाने संगनमत करून बीएसफोर श्रेणीतील ३४ कार वाहनांची ट्रॅक्टर श्रेणीत बोगस नोंदणी केली. त्यामुळे वाहन कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एआरटीओ कार्यालयातील ४ लिपिकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या वाहन नोंदणी घोटाळ्यातील क्रूजर, इनोव्हा, क्रेटा कार अशी चारचाकी वाहने या आधी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी झालेली आहेत, असे भासवून त्यांची कोणतीही कागदपत्रे न तपासता ४ लिपिकांनी आपल्या लॉगीन आयडीद्वारे बोगस ऑनलाइन नोंदणी केली. त्या वाहनांना एमएच 28-एजे या सिरीजचे नंबर दिलेत. ही सिरीज वाहनकराची सुट असलेल्या कृषी वाहन ट्रॅक्टरसाठीची आहे. मात्र, महागडी वाहने लिपिकांनी 'त्या' सिरीजमध्ये नोंदवल्याने शासनाचा मोठा वाहन कर बुडाला.

शिवाय बीएसफोर श्रेणीतील त्या वाहनांची नोंदणी एआरटीओ बुलढाणा यांनी अग्राह्य व अवैध ठरवून रद्द केली आहे. या वाहन नोंदणी घोटाळ्यातील वाहनांच्या मालकांना नोटीसेस पाठवून सुनावणीसाठी बोलावले असता त्यापैकी ८ वाहन मालकांनीच आपले जवाब नोंदवले. यातील अनेक वाहने ही दिपक पायघन (रा. आंधई ता. चिखली) नावाच्या एकाच व्यक्तीच्या नावावर नोंदलेली असल्याचे तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी एआरटीओ प्रसाद गाजरे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी एआरटीओ कार्यालयातील ४ लिपिक किशोर देशमुख, सुनिल सुर्यवंशी, मनोज खोब्रागडे, रमाकांत जोगेवार आणि एक एजंट दीपक राजपूत अशा ५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT