बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : मेंढ्या चरण्यास प्रतिबंध करणा-या वनमजुरांवर मेंढपाळांनी लाठ्या-काठ्यांनी जबरी हल्ला केल्याची घटना घडली. मंगळवारी (16 ऑगस्ट) दुपारी मोताळा वनपरिक्षेत्रातील खैरखेड बीटमध्ये वृक्षारोपण केलेल्या राखीव वनक्षेत्रात घडलेल्या या घटनेत दोन वनमजूर गंभीर जखमी झाले. यानंतर हल्लेखोर मेंढपाळ मेंढ्यांच्या कळपासह घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी मेंढपाळांचा मोठ्या संख्येने जमाव पहायला मिळाला. त्यांचा आक्रमक आवेश पाहून वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांनी प्रसंगावधान राखत त्यांच्याकडील बंदूकीचे तीन राऊंड हवेत फायर केले.
मेंढपाळांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोनही वनमजुरांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नारायण शेळके(वय 46) व भारत राठोड (वय 25) अशी त्यांची नावे आहेत. खैरखेड बीटमध्ये दोन वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याच्या कामावर वनमजूर शेळके व राठोड या दोघांना नेमलेले होते. मंगळवारी दुपारी राखीव वनक्षेत्रात मेंढ्यांच्या कळपांना चरण्यासाठी जबरीने घुसवण्याचा प्रयत्न करणा-या मेंढपाळांना या वनमजूरांनी मनाई केली. त्यावेळी मेंढपाळांनी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे, वनपाल सानप, वनरक्षक मोरे, मुंडे, बहूरूपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुरकुटे यांनी हवेत बंदूकीचे तीन राऊंड फायर केले व संघर्षाची परिस्थिती हाताळली. जखमी वनमजूरांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा