विदर्भ

बुलढाणा : व्हेईकल चार्जींग पॉईन्ट देण्याचे आमिष दाखवून २६ लाखांची फसवणूक

अमृता चौगुले

बुलडाणा,पुढारी वृत्तसेवा: खामगाव, किनगावराजा, बुलढाणा  येथील तीन जणांना इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जींग पॉईंट देण्याचे नावाखाली एकूण 26 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणुक करणा-या 5 संशयित सायबर गुन्हेगारांना बुलढाणा सायबर पोलीस शाखा व एलसीबीच्या पथकाने दिल्ली येथून जेरबंद केले आहे.

इलेक्ट्रो इव्ही पॉइंट घेणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेक वेबसाईट तयार करुन त्याची शोशल मिडीआ तसेच फोनद्वारे आरोपी माहिती देतात. चार्जींग स्टेशन घेण्यासाठी सरकारी अनुदानाबाबत आणि चार्जींग पॉईंट घेणाऱ्या उमेदवारास भविष्यात होणाऱ्या फायद्याबाबत ही सांगतात व त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही. फक्त रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार असल्याचे सांगत आहेत. ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे त्यांना टॅक्स,जीएसटीसाठी बँकेमध्ये पैसे भरण्याचे सांगतात. याप्रकारे ग्राहक पैसे भरत असतांना त्यास पुन्हा रकमेची मागणी केल्या जाते.

खामगाव येथील जुबेर रीजवान बुरानी, गणेश भगवान शिंगणे (रा.किनगावराजा), पवनकुमार देशमुख, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खामगाव,किनगावराजा व बुलढाणा अशा तीन पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्हेगारांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.  या गुन्हयातील फसवणूक झालेली एकुण रक्कम 26 लाख इतकी आहे. तीनही गुन्हयात आरोपींनी गुन्ह्यांत एकसारखी पध्दती वापरली हाेती.

ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी आरोपी हे केंद्र सरकारने अधिकृत केलेल्या मान्यता प्राप्त संस्थेचे कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून रिजर्व बँक ऑफ इंडीयाचे डिपॉझीट सर्टिफिकेट,पेमेंट रिसिप्ट,पब्लीक चार्जींग स्टेशन ॲग्रीमेंट, डिस्कॉम फी,टॅक्स, जीएसटी आदींचे नावाखाली ऑनलाईन रक्कम त्यांच्या वेगवेगळया खात्यात वळवून फिर्यादींना केंद्रीय संस्थेकडून इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जींग पाँईंट मंजूर करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय पथकाकडून निर्धारीत केलेल्या जागेचे परीक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच त्यांचे पत्यावर येवुन निरीक्षण करणार आहेत, असा विश्वास देवुन राहत्या घराचे पत्यावर व व्हाटस्ॲपवर केंद्रीय पथकाचा लोगो असलेल्या पेपरवरील मंजूरीच्या ऑर्डर्स स्पीड पोस्टाने पाठविण्यात येतील असे सांगितले जात आहे.

दरम्‍यान, मागणी केलेली रक्‍कम मिळालेनंतर संपर्क करण्यासाठी वापर केलेले मोबाईल क्रमांक बंद करतात. याबाबत सायबर टिम व स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आरोपीकडुन 8 मोबाईल हॅन्डसेट, 1लॅपटॉप, 1हॉटस्पॉट, डेबीट कार्ड,पॅनकार्ड, आधारकार्ड,बँक पासबुक,रोख रक्कम 73,780 रुपये, बॅकेमध्ये गोठविण्यात आलेली रक्कम 2,64,491 रुपये असा एकुण 5,42,271 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT