विदर्भ

नागपूर : दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उसळला भीमसागर

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे शांत असलेल्या दीक्षाभूमीवर आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रचंड भिमसागर उसळला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन रूढी परंपरांच्या वणव्यात पोळून निघालेल्या समाजाला मानवी मूल्ये दिली. याच दीक्षाभूमीवर अस्पृश्यांच्या जीवनात निळी पहाट उगवली तो दिवस विजयादशमीचा. या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच थायलंड, जपान, हॉंगकॉंग, तायवान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका येथून धम्मगुरुंचे आगमन यावर्षी झाले आहे.

दीक्षाभूमीपासून तर शांतीवन आणि ड्रॅगन पॅलेस परिसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. बौद्ध बांधवांचे थवे हातात निळे झेंडे घेऊन दीक्षाभूमीवर येत आहेत. अनेक ठिकाणी बुद्ध आणि भीमगीतांच्या मैफिली सजल्या आहेत. सभोवतालच्या सर्व रस्त्यांवर भीमसैनिकांची गर्दी दिसत आहे. दीक्षाभूमीवर अनुयायांनी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी रांग लावण्यास सुरुवात केली होती.

दरवर्षी दीक्षाभूमी परिसर व परिसराबाहेर सुमारे साडेसातशे स्टॉल्स लावण्यात येतात. बाहेर रस्त्यावर ५०० आणि दीक्षाभूमी पटांगणात यावर्षी अडीचशे ते तीनशे स्टॉल्स लावण्यात आले आहे. यातील सर्वाधिक स्टॉल्स पुस्तकांचे आहेत, हे विशेष. जगभरातून येणाऱ्या बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमीपरिसरात विविध सामाजिक संघटनांनी अन्नदानाची व्यवस्था केली आहे. योसोबतच निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर, फळ वाटप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

दीक्षाभूमीवर दरवर्षी होणाऱ्या गर्दीमुळे वर्धा मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडूनही पार्किंगसाठी मेट्रो स्टेशन परिसर आणि आता नव्याने तयार झालेल्या सिमेंट रोडच्या बाजूच्या जागेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंतही वर्धा मार्गावरील वाहतूक खोळंबली नव्हती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT