A youth was killed by a severe electric shock
बीड : विजेच्या तीव्र धक्क्याने युवक ठार File Photo
भंडारा

भंडारा : शेतातील विजेच्या करंटने युवकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी तारांमधून विजेचा प्रवाह सुरू करण्यात आला होता. त्या तारांचा स्पर्श झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खांबा येथे उघडकिस आली. ही बाब संबंधित शेतकऱ्याला माहित होताच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्या युवकाचा मृतदेह जवळील तलावात फेकून दिला. ही घटना उघडकीस येताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अतिरिक्त पोलिसांचा ताफा बोलविण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.13) घडली आहे. साकोली तालुक्यातील खांबा येथे उघडकीस आली.

शैलेश संजू रहांगडाले (रा. खांबा) असे मृताचे नाव आहे. तर नाजूक रघुनाथ रहांगडाले आणि पियुष रहांगडाले (दोघेही रा. खांबा) अशी आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपी नाजूक आणि पियुष हे नात्याने काका-पुतण्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नाजूक याने गावातील शेती भाड्याने घेऊन तिथे उसाची लागवड केली आहे. उस पिकाचे वन्यप्राण्यांपासून नुकसान होऊ नये म्हणून नाजूक रहांगडाले याने शेताभोवती विद्युत तार लावून विजेचा प्रवाह सुरू केला होता. १२ जुलै रोजी आरोपी नाजूक याचा पुतण्या पियुष याने शैलेशला सोबत घेऊन शेतावर गेला. शेतात कापलेले गवत आणण्यासाठी पियुषने शैलेशला शेतात जाण्यास सांगितले. दरम्यान, शेतात शिरताच जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने शैलेशचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पियुषने त्याचा काका नाजूक रहांगडाले याला दिली. त्यानंतर दोघांनीही शेतात जाऊन लावलेले विजेचे तार काढून घेतले. त्यानंतर दोघांनीही अंधार होण्याची वाट पाहिली. अंधार झाल्यानंतर दोघेही शेतावर गेले आणि शैलेशचा मृतदेह उचलून जवळील शेततलावात फेकून दिले. ही घटना उजेडात येताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती सांभाळली. रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण असल्याने अतिरिक्त पोलिस कुमक बोलविण्यात आली आहे. याप्रकरणी साकोली पोलिसांनी आरोपी नाजूक आणि पियुष रहांगडाले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

SCROLL FOR NEXT