भंडारा : गोसिखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यालगत शौचास गेलेल्या तरूणाचा पाय घसरून कालव्यात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२८) सकाळी ६ च्या सुमारास घडली. रवींद्र श्रावन रामटेके (वय ३८, रा. जांभुळघाट ता चिमूर, जि.चंद्रपूर, हल्ली मुक्काम पवनी ता पवनी, जि. भंडारा) असे मृत तरूणाचे नाव आहे.
रविंद्र रामटेके हा पहाटेच्या सुमारास खापरी रोडला फिरायला गेला होता. यावेळी तो गोसिखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यालगत शौचास गेला पाय घसरून कालव्यात पडला. कालव्यात पाणी जास्त असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. रविंद्र रामटेके हा पवनी येथील आदित्य अनघा बँकेत नोकरीला होता तर पत्नी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे नर्स म्हणून नोकरीला आहे. त्याला तीन वर्षांचा मुलगा असून युवकाच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पवनी पोलिसांत करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फडणीकर अधिक तपास करीत आहेत.