भंडारा: विविध जिल्ह्यातून जप्त करण्यात आलेली जनावरे गोशाळेत संगोपनासाठी ठेवण्यात आली होती. परंतु, गोशाळेच्या संचालकांनी बनावट हमीपत्र तयार करुन त्या जनावरांची परस्पर विक्री केली. यात ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
चौकशीअंती ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर लाखनी पोलिस ठाण्यात गोशाळेच्या ३३ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गैरप्रकार लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील अन्नपूर्ण गोरक्षण संस्था, भवानी गोशाळा, निर्मल गोशाळा, सुखरुप गोशाळा, रेंगेपार कोहळी येथील मातोश्री गोशाळा येथे घडला.
या गोशाळांमध्ये सन २०१८ ते २०२३ या कालावधीत भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या अधिकाºयांनी जप्त केलेली जनावरे संगोपनासाठी ठेवण्यात आली होती. परंतु, गोशाळेच्या संचालकांनी न्यायालयाचे आदेश प्राप्त न करता बनावट हमीपत्र तयार करुन जनावरांची परस्पर विक्री करुन शासनाची ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांनी फसवणूक केली.
या प्रकरणाची तक्रार भंवरलाल जैन यांनी २०२३ मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर लाखनी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. चौकशीत हा गैरप्रकार उजेडात आला.
याप्रकरणी गोशाळा संस्थेचे मंगेश गोपीचंद राघोर्ते, विनोव वादो बेहरे, धनंजय नारायण दिघोरे, मनोज गोपीचंद राघोर्ते, अजय बाजीराव मेश्राम, सबिता विजय भूते, झांशी मनोज राघोर्ते, राजेश्वर भाऊराव कमाने, माणिक देवाजी जिवतोडे, नाना नत्थू जिवतोडे, भागवत भिकाराम शिवनकर, भोपेश शालिक ब्राम्हणकर, धनराज नारायण दिघोरे, दिनेश आसाराम भाजीपाले, प्रभाकर जिवतोडे, सुरेश कापगते, शिवराम गिहेपुंजे, पांडुरंग कापगते, यशपाल युवराज कापगते, शंभुभाई पटेल, राकेश सुखदेव सार्वे, ओमप्रकाश गजानन लांजेवार, भास्कर गोपीचंद भोतमांगे, सचिन शालीक नागलवाडे, ओमप्रकाश गोपीचंद भोतमांगे, शामराव वासूदेव चारमोडे, नरेश बाळकृष्ण पिंपळशेंडे, मंगेश डुलीचंद तरोणे, कैलाश काळसर्पे, राकेश शरद कठाणे, विनोद काशीराम भोंडे, वामन माधव कमाने, रविंद्र शिवशंकर काळसर्पे सर्व रा. पिंपळगाव/सडक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव करीत आहेत.