भंडारा : वनपरिक्षेत्र अड्याळ येथील देवरी जंगल परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत पट्टेदार वाघाने चार जणांवर अचानक धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.४० वाजता देवरी परिसरात वाघाने एका म्हशीचा बळी घेतला होता, तर दुसरी म्हैस जखमी झाली होती. याबाबत गणेश मारवाडे यांनी वन विभागाच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घटनास्थळी गणेश मारवाडे, त्यांचे मोठे भाऊ, गावातील एक युवक आणि डॉ. पवन अरविंद पावडे (पशुधन विकास अधिकारी, पालांदूर) हे पोहोचले.
दरम्यान, शेतशिवारालगत मृत म्हशीचे छायाचित्रण सुरू असतानाच अचानक पट्टेदार वाघ समोर आला आणि चारही जणांवर धावून गेला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, उपस्थितांनी मोठ्याने आरडाओरडा करत कुऱ्हाड दाखवत धैर्याने परिस्थितीचा सामना केला. त्यामुळे वाघ काही अंतरावर थांबला आणि सर्वजण तिथून पळून जाऊन जीव वाचवण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात डॉ. पवन पावडे यांनी महत्त्वाची सूचना करताना सांगितले की, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना थेट घटनास्थळी न बोलावता, प्रथम मृत पशू सुरक्षित ठिकाणी हलवावा. त्यानंतरच पंचनामा व शवविच्छेदन प्रक्रिया करावी. तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानंतरच घटनास्थळी जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विनाकारण जीव धोक्यात टाकू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. घटलेल्या घटनेने देवरी/ गोंदी व परिसरात वाघा विषयी मोठी दहशत पसरली आहे. वनविभागाने लक्ष घालत नागरिकांना सावधगिरीच्या सूचना पुरविणे गरजेचे आहे.