भंडारा

भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यात एकाच दिवशी तीन अपघात; तिघांचा मृत्यू

backup backup

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : लाखनी तालुक्यातील मासलमेटा, लाखांदूर तालुक्यातील खैरना आणि तुमसर तालुक्यातील मोहगाव येथे घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

लाखनी पोलिस ठाणे हद्दीतील मासलमेटा मार्गावर पिकअप वाहन अचानक उलटल्याने केबीनमध्ये बसलेला विपीन सुरेश लांजेवार (३५ रा. समनापुर जि.गोंदिया) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी पिकअप वाहन चालक मनोज उदयलाल परतेकी (रा. कारंजा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही घटना ५ एप्रिलच्या दुपारी १ वाजता घडली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देवीदास बागडे करीत आहेत.

खैरना-दोनाड या रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला धडक दिल्याने महिलेच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना ५ एप्रिल रोजी घडली. सुंदराबाई देविदास भानारकर (वय ६५ रा. खैरना) असे मृत महिलेचे नाव आहे. सुंदराबाई देविदास भानारकर गावातील नामदेव पचारे यांच्या मुलीच्या लग्नासाठी जात होत्या. खैरणा-दोनाड या रस्त्याच्या बाजूला शेतशिवारात सदर लग्नाचा कार्यक्रम होता. यावेळी सुंदराबाई भानारकर रस्ता ओलांडतांना समोरून येणाºया दुचाकी क्र . एमएच ४०  एएफ  २६०६ ने धडक दिली. यावेळी मंडपात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर महिलेस लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी महिलेस मृत घोषित केले.

भरधाव असलेली दुचाकी नालीत कोसळल्याने एका १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना दावेझरी येथे घडली. वृषभ अजय वंजारी (१३) रा. मोहगाव खदान हा त्याचा मित्र अपूर्व रामेश्वर लोनारकर (१३) याच्यासोबत दुचाकीने मोहगाव खदानकडे दुचाकीने जात होता. दरम्यान भरधाव असलेली दुचाकी नालीत कोसळली. यात वृषभ वंजारी याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

SCROLL FOR NEXT