नवेगाव नागझिरा अभयारण्यात गव्याची शिकार करताना दिसून आलेली एन 2 वाघिण व तिचे बछडे Pudhari photo
भंडारा

Tiger News |नवेगाव-नागझिऱ्यात व्याघ्र स्थानांतरणाला यश

तीन छाव्यांसह दिसली एन 2 वाघिण, वन्यप्रेमींमध्ये उत्साह

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या व्याघ्र संवर्धन स्थानांतरण उपक्रमाला अखेर यश आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून नवेगाव-नागझिऱ्यात स्थानांतरण केलेल्या एन २ वाघिण तिच्या तीन छाव्यांसह रानगव्याची शिकार करतानाचे छायाचित्र प्राप्त झाले आहे. एन २ वाघिणीच्या छाव्यांच्या जन्मामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे. व्याघ्र संवर्धनाचा हा उपक्रम यशस्वी झाल्याने वन्यजीव विभागासह वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन स्थानांतरण उपक्रमामध्ये आतापर्यंत एकूण ३ वाघिण चंद्रपूर जिल्ह्यातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले होते. यातील पहिल्या टप्प्यामध्ये एन१ व एन२ या वाघिनींना २० मे २०२३ रोजी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एन३ या वाघिणीला ११ एप्रिल २०२४ रोजी नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे निसर्गमुक्त करण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात एन २ वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपला अधिवास निर्माण केला आहे. सद्यास्थितीमध्ये ट्रॅपकॅमेराद्वारे एन२ वाघिणीच्या हालचालीवर संनियंत्रण करण्यात येत आहे. सदर ट्रॅप कॅमेरामध्ये एन२ वाघिणीचे प्रथमच तिच्या ३ छाव्यांसोबत रानगव्याची शिकार करतानाचे छायाचित्र प्राप्त झाले आहे.

सद्या निसर्गमुक्त केलेल्या ३ वाघिनींपैकी २ वाघिणींनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव गाभा आणि बफर क्षेत्रात आपला अधिवास निर्माण केला आहे. एन२ वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. यामध्ये कमांड आणि कंट्रोल रुमचा महत्वाचा वाटा आहे.

या यशामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व) नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा आर., साकोलीचे उपसंचालक पवन जेफ, गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. के. भोसले, सपना टेंभरे, दिलीप कौशीक यांची मोलाची भूमिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT