भंडारा : लाखनी तालुक्यात निसर्गाच्या रौद्ररूपाचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. झरप येथे शुक्रवारी (दि.१३) दुपारी विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसादरम्यान, घरासमोरील अंगणात बांधलेल्या बैलजोडीवर वीज कोसळल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी भूषण रघुनाथ कोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास लाखनी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान, झरप येथील रहिवासी असलेले शेतकरी भूषण कोरे यांच्या घरासमोरील अंगणात, झाडाला बांधलेल्या त्यांच्या बैलजोडीवर अचानक वीज कोसळली. विजेचा प्रकोप इतका भयंकर होता की, दोन्ही बैलांनी जागीच प्राण सोडले. या घटनेत भूषण कोरे यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बैलजोडी गमावल्याने कोरे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तलाठी मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी पावडे, झरपचे सरपंच जगदीश भोयर, पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, पोलीस पाटील शरद कोरे आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल घुले यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी कोरे कुटुंबाला धीर देत शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पीडित शेतकरी भूषण कोरे यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.