Bhandara Sakoli Leopard Rescue  Pudhari
भंडारा

Bhandara Leopard Rescue | पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याला वनविभागाने केले सुरक्षित जेरबंद

सावरबंध वनपरिक्षेत्रातील वळद येथे शिघ्र कृती दलाची धाडसी मोहीम; आरोग्य तपासणीनंतर बिबट्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

पुढारी वृत्तसेवा

Bhandara Sakoli Leopard Rescue

भंडारा : साकोली वनपरिक्षेत्रातील सावरबंध बिट अंतर्गत मौजा वळद येथे एका पाण्याच्या पाईपमध्ये लपून बसलेल्या वन्यप्राणी बिबट्याला वनविभागाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी बचाव मोहिमेद्वारे सुरक्षितरीत्या जेरबंद करून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

ग्रामपंचायत सरपंच माधवी बडवाईक यांनी दिलेल्या सतर्क माहितीमुळे संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टळला. उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग व सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आर. कटरे, वनकर्मचारी, शिघ्र कृती दल आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

साकोली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सावरबंधमधील वळद येथे भोजराम भिवा बनकर यांच्या शेतालगत असलेल्या दुर्गाबाई डोह नहरच्या खालील पाण्याच्या पाईपमध्ये बिबट्या लपून बसल्याचे आढळून आले. ही माहिती वळद ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी बडवाईक यांनी तत्काळ सावरबंध बिटाचे वनरक्षक पी. आर. अंबुले यांना दिली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आर. कटरे यांनी आपल्या अधिनस्त वनरक्षक व वनकर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या मानवी वस्तीच्या अगदी जवळ असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी परिसरातील नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनक्षेत्र साकोलीच्या वन्यप्राणी बचाव दलाला (शिघ्र कृती दल) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दलाने घटनास्थळाची सखोल पाहणी करून पाईपच्या एका बाजूस पिंजरा बसविला. अत्यंत संयम, कौशल्य आणि नियोजनाचा वापर करत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. वनविभागाच्या या तत्पर आणि व्यावसायिक कार्यपद्धतीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

यानंतर एनएनटीआरचे पशुधन विकास अधिकारी  मेघराज तुलावी यांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली. तपासणीत सदर बिबट (नर) पूर्णतः शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT