भंडारा: जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आज रविवारी पोलिस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जनता दरबारात जनतेऐवजी पक्षाचे कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचाचीच गर्दी अधिक दिसून आली. सभागृहाच्या अर्ध्याहून अधिक खुर्च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी भरल्या होत्या. दरबार सकाळी ११ वाजता सुरू होणार होता. प्रत्यक्षात जनतेच्या तक्रारी दुपारी १२.३० नंतर स्वीकारण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, आज रविवार आणि त्यातल्यात्यात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा जनता दरबार घेतल्याने बहुतांश नागरिक येऊ शकले नाहीत. शिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
या जनता दरबाराला आमदार परिणय फुके, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी सावनकुमार, पोलिस अधिक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
जनता दरबाराची नियोजित वेळ सकाळी ११ वाजता होती. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर पोहोचले. पालकमंत्री डॉ. भोयर दुपारी १२ वाजता पोहोचले. दुपारी १२:३० वाजेपर्यंत जनतेला संबोधित करण्यात आले. त्यानंतर, नागरिकांना त्यांच्या तक्रारींच्या प्रती त्यांच्या टोकन क्रमांकांनुसार मंचावर बोलावण्यात आले. एकावेळी दहा जणांना तक्रारी घेऊन बोलविण्यात आले. तक्रारी ऐकल्यानंतर पालकमंत्री भोयर यांनी संबंधित विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. विभागप्रमुखांनाही तसे निर्देश त्यांनी दिले.
आज सर्वपित्री अमावस्या असल्याने जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना या जनता दरबाराचा लाभ घेता आला नाही. तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी भंडारा तालुक्यातून आल्या. आजच्या दिवशी जिल्हास्तरीय जनता दरबार आयोजित केल्याने प्रशासकीय अधिकाºयांनीही नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्री जनता दरबार हा गावपातळीवरील समस्या, निवेदनांचे निराकरण करण्याचा उपक्रम असून हा याद्वारे तालुकास्तरावरील समस्या मार्गी लागत ज्या प्रलंबीत राहतील त्या दर सोमवारी शासन दरबारी सादर करण्याचे पालकमंत्री भोयर यांनी सांगितले. शेतकºयांच्या निवेदनाव्दारे प्राप्त मागणी लक्षात घेवून शासनाने रब्बी धान खरेदी मुदत वाढवली असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुकास्तरावर पालकमंत्री जनता दरबारामध्ये २०० च्यावर तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्यातील ८० टक्के तक्रारी या निकाली काढण्यात आलेल्या असून उर्वरित तक्रारी निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपल्याला पालकमंत्री जनता दरबार हा कार्यक्रम नेहमीसाठी राबवायचा आहे. हा उपक्रम सर्व यंत्रणांनी गांभिर्याने घ्यावा, असेही त्यांनी नमुद केले.