Gosikhurd Canal Burst
भंडारा: गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेतील रेंगोळा ते ढीवरखेडा हा ८४०० मीटर लांबीचा पालांदूर शाखा कालवा सायगावजवळ सुरक्षा भिंत कोसळल्याने फुटला. गत पंधरा वर्षापासून या कालव्याचे काम सुरु होते. मात्र पाणी प्रवाहित न झाल्याने कालव्याची परिपक्वता कळली नव्हती. बुधवारी, कालव्यात पाणी येताच सुरक्षा भिंतीजवळून दोन्ही बाजुंनी कालवा फुटला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला गोसेखुर्द धरण अजूनही शेतकऱ्यांना दिवास्वप्नच ठरत आहे. शेतकरी संकटकालीन परिस्थितीत गोसेखुर्दच्या पाण्याकरिता आसुसलेला असताना पहिल्याच प्रयत्नात फुटलेल्या कालव्यामुळे बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभा ठाकलेला आहे.
कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी स्वच्छता अपेक्षित होती. जिथे पाण्याला अडथळा निर्माण होतो त्याच्या मागे पाण्याचा खूप मोठा दाब तयार होतो. त्या दाबामुळे कच्च्या बांधकामाचा प्रभाव पडून कालवा फुटण्याचा प्रकार सायगावजवळ घडला. उताराच्या दिशेने पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असते तर ढिवरखेडा टेलपर्यंत पाणी पोहोचले असते. पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने पाण्याची गरज आहे. परंतु, पाणी सोडताच कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.