भंडारा : अनैतिक संबंधातून मित्राने ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मित्राची चाकुने वार करुन हत्या केली. ही घटना आज (२३ मार्च) सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान तुमसर येथून पाच किलोमीटर अंतर असलेल्या देव्हाडी गावात घडली. अंकुश श्रीमंत साठवणे (३५, रा.सुभाष वार्ड देव्हाडी) असे मृतकाचे नाव आहे. या हल्ल्यात अंकूश याची पुतणी आकांक्षी संतोष साठवणे (१५) ही गंभीर जखमी झाली. आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना बिरणवारे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मृतक अंकुश साठवणे व आरोपी रामेश्वर बिरणवारे हे मित्र होते. अंकुश साठवणे हा देव्हाडी येथील ग्रामपंचायत सदस्य होता. काही महिन्यापूर्वी अंकुश व रामेश्वर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अंकुश हा नागपूरला राहण्यासाठी गेला. परंतु शनिवारी, ग्रामपंचायतची बैठक असल्याने तो देव्हाडी येथे आला होता.
आज रविवारी, अंकुशच्या वडिलांनी आरोपीला समझोता करण्याकरिता घरी बोलावले होते. परंतु घरी येताच आरोपी रामेश्वरने अंकुशवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. यात पुतणी आकांक्षी धावून आल्याने तिच्या कमरेला चाकू लागला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. अंकुशला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अंकुशचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती तुमसर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी तुमसर पोलिस पोहोचून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर देव्हाडी गावात तणावाची स्थिती निर्माण असून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात देव्हाडी येथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मृतक हा ग्रामपंचायत सदस्य असून तो अविवाहित होता.