भंडारा

Bhandara Crime : बाळ विक्री प्रकरणात ट्विस्ट, 'डॉक्टर'च निघाला मुख्य सूत्रधार; साडेचार लाखांना विकलेले दुसरे बाळही ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडाऱ्यात खळबळ उडवून देणाऱ्या बाळ विक्री प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली असून, पोलिसांच्या हाती आता या रॅकेटचे दुसरे मोठे धागेदोरे लागले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा जिल्हा बालकल्याण समिती आणि पोलिसांनी मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथून डिसेंबर महिन्यात विकले गेलेले दुसरे बाळ ताब्यात घेतले. या व्यवहारासाठी तब्बल ४ लाख ७० हजार रुपये मोजले गेल्याचे उघड झाले असून, या प्रकरणात मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

उपचाराच्या नावाखाली सुरू होता 'सौदा'

३ फेब्रुवारी रोजी एका बाळाच्या विक्रीचा प्रयत्न बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळे फसला आणि या रॅकेटचा पर्दाफाश झाला. तपासादरम्यान असे समोर आले की, गोंदिया येथील 'न्यू बालाजी हॉस्पिटल'चा संचालक डॉ. नितेश बाजपेयी हा उपचाराच्या नावाखाली गरीब कुटुंबांच्या बाळांचा सौदा करत होता. वरठी पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत डॉ. बाजपेयीसह पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.४ लाख ७० हजारांत व्यवहार; ५० हजार 'ऑनलाइन'

डिसेंबर महिन्यात झालेल्या या दुसऱ्या बाळ विक्री प्रकरणातील आर्थिक व्यवहार धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बाळाचा सौदा ४ लाख ७० हजार रुपयांत झाला होता. यात ४ लाख रुपये रोख स्वरूपात, तर ५० हजार रुपये थेट डॉक्टरांच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले होते. उर्वरित २० हजार रुपयांचा व्यवहारही मध्यस्थांमार्फत पूर्ण झाला होता.

भीतीपोटी नातेवाईकांकडे घेतला होता आश्रय

बाळ विकत घेणारे दाम्पत्य मोहाडी तालुक्यातील मोहदूरा येथील रहिवासी आहे. बाळ विक्रीचे प्रकरण पोलीस दरबारी पोहोचल्याचे समजताच, कारवाईच्या भीतीपोटी हे दाम्पत्य बाळासह मोहगाव देवी येथील नातेवाईकांकडे लपून बसले होते. मात्र, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोहगाव देवी येथे छापा टाकून दोन महिन्यांच्या या बाळाला सुखरूप ताब्यात घेतले.

बाळ जिल्हा रुग्णालयात दाखल

हस्तगत केलेले बाळ सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, डॉ. बाजपेयी याने अशा पद्धतीने आणखी किती बाळांची विक्री केली आहे? या रॅकेटमध्ये अजून कोणत्या बड्या हस्तींचा समावेश आहे? याची पाळेमुळे खोदण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT