भंडारा : गाय खरेदीकरिता दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण केल्याची घटना जवाहरनगर येथे उघडकीस आली.
फिर्यादी सुमित मंगल मेश्राम (३८, रा. गांधी वॉर्ड पेट्रोलपंप ठाणा) यांनी आदिवासी दुग्ध उत्पादक फॉर्मर प्रोड्युसर कंपनीचे कार्यालय पेट्रोलपंप ठाणा येथे सुरू केले आहे. ही कंपनी शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज मंजूर करून त्या रकमेतून त्यांना जनावरे खरेदी करून देते.
संशयित आरोपी निलेश ठाकरे (३८, रा. गोंदिया) यांना बँकेमार्फत आदिवासी दुग्धउत्पादक फॉर्मर प्रोड्यर कंपनीने १० लाखाचे लोन मंजूर केले होते. त्यापैकी ७ लाख ५० हजार रुपये निलेश ठाकरे यांना देण्यात आले. उर्वरीत २ लाख ५० हजार रुपये कंपनीने गाय खरेदी करण्यसाठी धर्मेंदर सिंग राठोड (रा. जोधपूर, राजस्थान) यांना बयाना म्हणून दिले. त्यांच्याकडून खरेदी केलेल्या गायी आरोपी निलेश ठाकरे यांना देण्याचे कंपनीने ठरविले होते. नोव्हेंबर २०२४ पासून निलेश ठाकरे हा फिर्यादीला वारंवार फोन करुन त्यांना गायीचे बयाना दिलेली रक्कम परत द्या, मला गायीची आवश्यकता नाही, असे बोलत होता.
दि. ११ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता गांधी वॉर्ड पेट्रोलपंप ठाणा येथे संशयित आरोपी निलेश ठाकरे व त्याच्यासोबत आलेल्या ६ आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या पत्नीला पैशाची मागणी करत शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्यांनी आणलेल्या चारचाकीत सुमीत मेश्राम यांना जबरदस्तीने बसवून त्यांचे अपहरण केले. यानंतर फिर्यादीच्या पत्नीने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. यावेळी आरोपींना तक्रार केल्याचे माहित होताच त्यांनी फिर्यादीला एलोरा पेपर मिल देव्हाडा येथे सोडून दिले. याप्रकरणी ७ आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भिमाजी पाटील करीत आहेत.