भंडारा: शेतात तूर कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना बुधवारी भंडारा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कवलेवाडा येथे घडली होती. या घटनेनंतर गावात रात्रभर तणाव होता. महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि पकडलेल्या गावकऱ्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. प्रशासनाने गावकऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महिलेच्या पार्थिवावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कवलेवाडा येथे नंदा खंडाते (५०) ही महिला शेतात तूर कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करुन ठार केले. हा वाघ रात्री उशिरापर्यंत महिलेच्या मृतदेहाजवळच बसून होता. याच वाघाने काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर हल्ला करुन ठार केले होते. त्यामुळे गावकरी संतापले. घटनेची माहिती देवूनही बराच वेळपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी न आल्याने गावकरी अधिकच संतप्त झाले.
त्यामुळे रात्रीच्या सुमारास लाठ्याकाठ्या घेऊन गावकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत त्यांचे वाहन पेटवून दिले. रात्रीच्या सुमारास वाघाला बेशुद्ध करुन ताब्यात घेण्यात आले. मात्र महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व वाहन जाळल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या गावकऱ्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. अखेरीस पोलिस अधिकाऱ्यांनी लोकांची समजूत काढून त्यांना शांत केले. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
आज गुरुवारी दुपारच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात महिलेचा मृतदेह गावात आणण्यात आला. यावेळी एकच गर्दी झाली होती. दुपारी ४ वाजताच्या सुमारास महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा प्रचंड मोठा ताफा गावात दाखल होता.
वन विभागाने महिलेच्या कुटुंबियांची आर्थिक मदतीची मागणी मान्य केली आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गावकऱ्यांबाबत काय निर्णय झाला, याचा तपशिल मिळू शकला नाही. बुधवारी घडलेल्या घटनेपासून महिलेवर अंत्यसंस्कार होईपर्यंत गावात तणावाचे वातावरण होते.