भंडारा: एका विवाहित महिलेसोबत तिच्या वडिलाच्या मित्राने लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी धमकी दिली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून महिलेने पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे नोंदविले आहेत.
यातील पिडीत महिला पवनी तालुक्यातील एका गावातील आहे. आरोपीचे नाव गोलू मुंडले (३०) रा. रुयाळ ता. पवनी असे आहे. महिलेचे वडिल आणि आरोपी हे मित्र असल्याने आरोपी लग्नाआधीपासून तिच्या घरी ये-जा करायचा. त्यामुळे ती त्याला ओळखत होती. ६ जानेवारी रोजी सदर महिला ही गावावरुन पवनी येथे आधारकार्ड दुरुस्तीच्या कामासाठी आली होती. ती पवनीच्या जुन्या बसस्थानकावर असताना त्याठिकाणी आरोपी गोलू हा दुचाकीने आला आणि आपण फिरून येऊ, असे सांगत तिला दुचाकीवर बसवून गोसे मार्गावरील एका लॉजमध्ये नेले. तिथे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर १७ जानेवारी रोजी पुन्हा पवनी येथील एका लॉजवर नेऊन संबंध निर्माण केले. त्यानंतर आरोपी वारंवार महिलेला फोन करुन आपल्याकडे येण्यास सांगत होता. अन्यथा पतीला सर्वकाही सांगण्याची धमकी देत होता. अखेरीस महिलेने आपली आपबिती पतीला सांगितली. तेव्हा पतीने आरोपीला, पत्नीला फोन न करण्याबाबत बजावले असता त्यालाच धमकी दिली. २९ जानेवारी रोजी आरोपी मुंडले हा थेट पती काम करीत असलेल्या ठिकाणी गेला. तिथे त्याने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी धमकी दिली. महिलेने आपल्या पतीसोबत पवनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी गोलू मुंडले याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.