भंडारा: कोका वन्यजीव अभयारण्यात रानडुकरांची शिकार करणाºया शिकाऱ्यांना न्यायालयाने एक हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. १० एप्रिल २०१९ रोजी कोका वन्यजीव अभयारण्याचे तत्कालिन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांनी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने ढिवरवाडा येथील रवि वनवे याच्या घराची तपासणी केली असता रानडुकराचे मांस शिजवत असताना आढळून आले. रवी वनवे आणि गणेश वनवे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनी बाळू लोंदासे, रविंद्र मेश्राम, प्रणित बावणे, घनश्याम मेश्राम, रविंद्र भुरे, महेंद्र न्हाने, शिवदास मेश्राम, जगन वाढवे या ९ आरोपींच्या मदतीने रानडुकराची शिकार केल्याचे निष्पन्न झाले.
सर्व आरोपींविरुद्ध वनगुन्हा नोंदवून तपास करुन प्रकरण मोहाडी येथील न्यायालयात दाखल करण्यात आले. वनपाल हत्तीमारे, आगलावे, वनरक्षक कदम, नागरगोजे, हंबूले यांनी तपासात सहकार्य करुन साक्ष नोंदविली. ११ आरोपींचे जबाब तत्कालिन सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर यांनी नोंदविली. न्या. बि.आर. पाटील यांनी या प्रकरणात सर्व आरोपींना दोषी ठरविले. त्यानुसार प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यासोबत आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्राची मंहकाळ यांनी बाजू मांडली.