Grain Theft Tumsar
भंडारा: तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हेल्मेट घालून मोटारसायकलवरून येणाऱ्या एका अज्ञात तरुणाने धान्याची दोन पोती मोटारसायकलवर ठेवून भरधाव वेगाने पळ काढल्याची घटना समोर आली आहे. सतत दोन दिवस ही चोरी करण्यात आली. या प्रकारामुळे बाजार समिती परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२४ व २५ नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस हा प्रकार घडल्याची माहिती आहे. हेल्मेट घातलेला एक तरुण मोटारसायकलने बाजार समितीच्या आवारात प्रवेश करतो. त्यानंतर धान्याची दोन पोती मोटारसायकलवर ठेवतो आणि कुणाच्या लक्षात येण्यापूर्वीच भरधाव वेगाने पसार होतो. विशेष म्हणजे, हा प्रकार दोन दिवसांपासून सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
सदर तरुण नेमका कोण आहे, तो कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार करीत आहे किंवा या चोरीमागे आणखी कुणाचा हात आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र, व्यापाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने तुमसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बाजार समितीतील सीसीटीव्ही कॅमेरात आरोपीच्या चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्याने हेल्मेट घातले होते. वाहनाच्या नंबर प्लेटही दिसत नाही. सुरक्षा रक्षकांनी त्याच्या पाठलाग केल्यावर एका सुरक्षा रक्षकाच्या पायावरून त्याने वाहन नेले.