लाखांदूर: आधारभूत केंद्रात धान मोजणी करून परतणारा ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील पारडी येथे घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाच्या ढिगाऱ्यामुळे ट्रॅक्टर आदळल्याने उमेश धर्मपाल किरसान (वय-३५, रा. पारडी ता. लाखांदूर) या चालकाचा मृत्यू झाला.
उमेश किरसान हे धान मोजणी करून आपल्या ट्रॅक्टरने परतीच्या मार्गावर होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या काही महिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात उमेश यांनी ट्रॅक्टर बाजूला घेतला. याच गडबडीत ट्रॅक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाच्या ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर जोरात आदळला.
अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टर जागीच उलटला आणि ट्रॅक्टरखाली दबल्याने उमेश किरसान यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला असलेला हा दगडाचा ढिगाराच या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच दिघोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.