भंडारा

bhandara Tigress Terror : वाघिणीच्या दहशतीमुळे ग्रामस्थांचा चक्काजाम, प्रशासनाविरुद्ध संताप

जखमी महिलेला आर्थिक मदतीसाठी शिवनटोला प्रवेशद्वारावर ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : साकोली तालुक्यात बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला असून, प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात आज रविवारी ग्रामस्थांनी साकोली-तिरोडा मार्ग रोखून धरला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रवेशद्वार असलेल्या शिवनटोला आणि पिटेझरी भागात सकाळी ११ वाजेपासून नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघिणीने मोठी दहशत निर्माण केली आहे. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंता मेश्राम (५०) यांचा वाघिणीने बळी घेतला होता. ही घटना ताजी असतानाच, शनिवारी (दि.२८) रोजी उमरझरी येथे शेतमजूर माया रामकृष्ण सोनवाने (४८) यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी माया सोनवाने यांना वेळेत मदत आणि उपचार न मिळाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थ आज ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले. काल शनिवारी परिसरात जाळपोळ झाली होती, तर आज नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत पीडित महिलेला तातडीने आर्थिक मदत मिळत नाही आणि नरभक्षक वाघिणीचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

यावेळी माजी जि.प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी आणि माहेश्वरी नेवारे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. लाखनीच्या वनपरिक्षेत्र अधिकाºयांना तात्काळ घटनास्थळी बोलवा, अन्यथा इतर गावांतील नागरिकांनाही आंदोलनात सामील करून घेऊ, अशी आक्रमक भूमिका डॉ. रंगारी यांनी मांडली.

पोलिस ताफा घटनास्थळी; तणावपूर्ण शांतता

आंदोलनाची माहिती मिळताच साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू साळवे, आशिष बोरकर, लाखनीचे पोलिस निरीक्षक बारसे, पोलिस उपनिरीक्षक निता इवनाते आणि अर्जुन बेडवाल यांच्यासह मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी गावकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम होते.

वन विभागाची शोधमोहीम

दुसरीकडे, वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे. परिसरात पिंजरा लावण्यात आला असून विशेष रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे. वाघिणीवर नजर ठेवण्यासाठी तात्पुरता टॉवर उभारला जात असून, वाघिण दिसताच ट्रँक्युलायझर गनने बेशुद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाघिणीचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेºयांचाही वापर केला जात आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, नागरिकांनी जंगलात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT