भंडारा

Bhandara Tiger Attack : गोबरवाही (हेटी) येथे वाघाचा थरारक हल्ला; गाई चारण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

भंडारा :तुमसर तालुक्यातील गोबरवाही (हेटी) येथील जंगलालगत सोमवारी (दि. ७ जुलै) दुपारी सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात बेनीराम राऊत (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेनीराम राऊत हे नेहमीप्रमाणे आपल्या मुलगा विजय राऊत याच्यासह गाई चरायला जंगलालगतच्या परिसरात गेले होते. गाई चरत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बेनीराम राऊत यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात त्यांना पकडून जवळील पाण्याच्या दिशेने फरफटत नेले. हा संपूर्ण थरार मुलगा विजय राऊत यांच्या डोळ्यांसमोर घडला.

घाबरलेल्या विजय राऊत यांनी तत्काळ गावात धाव घेऊन ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाला कळविले. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

मृत बेनीराम राऊत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. मोलमजुरी आणि गुरे चारण्याच्या व्यवसायावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.

दरम्यान, जंगलालगतच्या गावांमध्ये वाघाचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच मृताच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व शासकीय नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT