Bhandra Tiger Attack Pudhari Photo
भंडारा

Bhandra Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू!

धान कापणी करताना घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: घराघरांत दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचा उत्साह सुरू असताना साकोली तालुक्यातील बामणी गावात वाघाच्या हल्ल्यात आई-वडिलांसोबत शेतात धान कापणी करत असलेल्या २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मागून हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुणाल कैलास उईके याचा उपचारासाठी भंडाºयाला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी दुपारी सुमारे १ वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुणाल नेहमीप्रमाणे दुपारी सुमारे १ वाजता आई-वडिलांसोबत धान कापणीसाठी शेतात गेला होता. आई-वडील एका धानाच्या बांधीत कापणी करत असताना कुणाल जवळच्या दुसºया बांधीत धान कापत होता. याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मागून त्याच्यावर झडप घातली.

अनपेक्षित हल्ल्यामुळे शेतात एकच गोंधळ उडाला. मुलावर वाघाचा हल्ला होताच आई-वडील त्याच्या मदतीसाठी धावले. मात्र, समोर वाघ दिसताच ते भयभीत झाले. तरीही धैर्य एकवटून त्यांनी मोबाइलवरून गावातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी कुणालच्या मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले. मात्र, तोपर्यंत वाघ कुणालला फरफटत सुमारे २०० ते ३०० फूट अंतरावर घेऊन गेला होता.

गावकऱ्यांनी वाघाला पिटाळले
घटनास्थळी पोहोचलेल्या गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या आणि काटेरी फांद्यांच्या मदतीने आरडाओरड करून वाघाला पिटाळण्याचा प्रयत्न केला. अखेर वाघाच्या तावडीतून कुणालची सुटका करण्यात त्यांना यश आले. मात्र, तोपर्यंत वाघाच्या हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी झाला होता. गावकऱ्यांनी वेळ न दवडता त्याला उपचारासाठी लाखनी येथे नेले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला भंडाऱ्याला हलविण्याचा सल्ला दिला. भंडाऱ्याला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने उईके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

वन विभागाकडून शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावला. तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. मात्र, सुरुवातीच्या प्रयत्नांत वाघाला पकडण्यात यश आले नाही. घटनेनंतर परिसरातील वन्यजीवांच्या हालचाली आणि शेतात काम करणाºया नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने बामणीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT