भंडारा : तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देवनारा -कुरमुडा रस्त्यावरील तलावाजवळ पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज सोमवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. वन विभागाची चमू घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. वाघाची शिकार की घातपात? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवनारा-कुरमुडा गावाकडे जाणाऱ्या तलावाजवळ बैलांचा पट भरला आहे. यातच शौचालयाकरिता काही नागरिक गेले असता त्यांना पट्टेदार वाघ झोपलेल्या स्थितीत दिसला. तो वाघ असल्याची आरडाओरड सुरू झाली त्यामुळे एकच गर्दी वाघाजवळ जमली. वाघाजवळ गेले असता वाघाची कसलीही हालचाल होत नसल्याने वाघ हा मृत असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाची टिम घटनास्थळी पोहचली. सदर मृतक वाघ दीड ते दोन वर्षाचा असून तो नर जातीचा आहे.
परिसरात वाघाच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु या वाघाची शिकार करण्यात आली की घातपात करून मारण्यात आले, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर परिसर हा घनदाट जंगलाने व्यापला असून व तसेच मध्यप्रदेशाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्यामुळे वाघांची नेहमीच वावर असतो.
पट्टेदार वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला याकरिता चार डॉक्टरांचा चमू चिंचोली डेपो येथे हजर झाला. सायंकाळी ५ च्या सुमारास या मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन अहवाल आठ ते दहा दिवसात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी भोंगाळे तसेच कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे, लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य व नाकाडोंगरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.