Bhandara News : लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षांचा सश्रम कारावास! pudhari photo
भंडारा

Bhandara News : लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षांचा सश्रम कारावास!

६८ वर्षीय आरोपी, २५ हजारांचा दंडही; भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ६८ वर्षीय आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामचंद्र जगन मुंगुसमारे (रा. जांभोरा, ता. मोहाडी) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला २५ हजार रुपये दंडही ठोठावला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी हा निकाल दिला.

करडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जांभोरा येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही घटना घडली होती. आरोपीने अल्पवयीन पीडित बालकासोबत अश्लील कृत्य केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून करडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध महत्त्वाचे साक्षीदार, वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे आणि अन्य पुराव्यांची साखळी जोडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष आणि सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस कर्मचारी रितेश बोरकर यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT